खासदार संजय राऊत यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित !
मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपाचे प्रकरण
मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती; मात्र त्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राऊत यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली आणि त्यांना जामीन संमत केला. यामुळे त्यांना अंशतः दिलासा मिळाला आहे. शिक्षा सुनावतांना न्यायालयाने २५ सहस्र रुपयांचा दंड सुनावला. ही रक्कम मेधा यांना मानहानी म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
काय होता आरोप ?
मीरा-भाईंदर येथे बांधलेल्या १५४ सार्वजनिक शौचालयांतील १६ शौचालये बांधण्याच्या कंत्राटात बनावट कागदपत्रे सादर करून १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट केला होता. |