London : विश्‍वभ्रमण दिंडीचे लंडनमध्‍ये उत्‍साहात स्‍वागत !

आळंदी – संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज सप्‍तशतकोत्तर सुवर्ण जन्‍मोत्‍सवानिमित्त आळंदीतील विश्‍वशांती जगद़्‍गुरु सेवा संस्‍था संचलित संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर आणि जगद़्‍गुरु तुकाराम महाराज यांच्‍या विश्‍वभ्रमण यात्रेच्‍या माध्‍यमातून पोचलेल्‍या चल पादुकांचे लंडनमध्‍ये उत्‍साहात स्‍वागत झाले. या पादुकांच्‍या दर्शनाचा लाभ भारतातून लंडनमध्‍ये स्‍थायिक झालेल्‍या भाविकांनी घेतला. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्‍या माध्‍यमातून जगाच्‍या कल्‍याणासाठी पसायदानात वैश्‍विक प्रार्थना केली. संत साहित्‍याचा प्रसार, तसेच शांती, एकता आणि बंधुता या भावनेचा प्रचार अन् प्रसार करण्‍याच्‍या उद्देशाने हा ‘पादुका दर्शन’ कार्यक्रम आयोजित केला होता, असे विश्‍वशांती जगद़्‍गुरु सेवा संस्‍थेचे अध्‍यक्ष दादा कारंडे यांनी सांगितले. भारतातून बाहेरच्‍या देशात स्‍थानिक झालेल्‍यांना संत दर्शनाचा लाभ व्‍हावा आणि संत चरित्राची गोडी लागावी, हाच एकमेव उद्देश असल्‍याचेही कारंडे म्‍हणाले. लंडनमध्‍ये पादुकांचे पूजन, तसेच अभिषेक होणार असून दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रमही होणार आहे.