भूलतज्ञ संघटनेच्या वतीने ३ दिवसांच्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे कोल्हापूर येथे आयोजन !
कोल्हापूर, २६ सप्टेंबर (वार्ता.) – प्रसुती भूलतज्ञ संघटना ही ‘सिझेरियन’साठी लागणारी भूल आणि वेदनाविरहित प्रसूती करणार्या भारतीय भूलतज्ञांची संघटना आहे. या संघटनेच्या वतीने १७ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. ही परिषद २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आणि हॉटेल सयाजी येथे होईल. या परिषदेत भारतातून जवळपास ४०० भूलतज्ञ येणार आहेत, तसेच मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिका येथून डॉ. भवानी शंकर कोडाली, डॉ. आशिष सिन्हा, डॉ. लेनर्ड सोलोनिक, इंग्लंडहून डॉ. पूर्वा माकनी, डॉ. जेसिका हसलम आणि कतार येथून डॉ. करुणाकरन हे भूलतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती परिषदेच्या सचिव डॉ. अंजली कद्दू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत प्रसुतीच्या वेळी माता आणि अर्भक यांची सुरक्षितता, अचानक उद़्भवणार्या गुंतागुंती आणि इतर उपचार यांवर चर्चा होणार आहे. नैसर्गिक प्रसुतीच्या वेळी मातेला होणार्या वेदनांचे शमन कसे करावे ?, अतीदक्षता विभागात आवश्यक काळजी यावरही चर्चा होणार आहे. या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष डॉ. शीतल देसाई, खजिनदार डॉ. शिवाजी जाधव, डॉ. संगीता पाटील, डॉ. आशिष नलवडे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत सांगितलेली काही सूत्रे
१. अलीकडे प्रसुतीसाठी येणार्या ७० ते ८० टक्के मातांना उच्च रक्तदाब, साखर, अतीवजन यांसह काही ना काही समस्याही असतेच. त्यामुळे अलीकडच्या काळात होणार्या प्रसुती क्लिष्ट असतात.
२. अलीकडच्या काळात विवाह विलंबाने होत असल्याने त्यांच्या प्रसुती क्लिष्ट होतात. बहुतांश प्रसुती होणार्या महिला या वय वर्षे ३० च्या पुढच्या असतात. त्यामुळे बहुतांश वेळेस त्यांच्यासाठी ‘सिझेरियन’चाच पर्याय वापरला जातो.
३. बहुतांश महिला-मुली यांची वेदना सहन करण्याची सिद्धता नसते. बहुतांश वेळेस त्यांना एकच मूल हवे असते. त्यामुळे ‘सिझेरियन’चा पर्याय वापरला जातो.
४. शासकीय रुग्णालयात अधिक संख्येने महिला नैसर्गिकरित्या प्रसुत होतात. हे प्रमाण खासगी रुग्णालयांपेक्षा अधिक आहे, हे डॉक्टरांनी मान्य केले.