आत्मज्ञान ज्याच्या वर्तनात उतरले आहे, त्याला ‘पंडित’ समजावे !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : कः पण्डितः ?
अर्थ : पंडित कुणास म्हणावे ?
उत्तर : यः क्रियवान् स पण्डितः ।
अर्थ : जो कृतीने युक्त आहे, त्याला ‘पंडित’ म्हणावे.
पंडा म्हणजे, आत्मविषयक बुद्धी आणि आत्मज्ञान. हे आत्मज्ञान ज्याच्या वर्तनात उतरले आहे, त्याला पंडित असे समजावे. आपण व्यवहारात पंडित शब्द ‘पुस्तकी विद्वत्तेचा वाचक’ म्हणून स्वीकारला आहे. ते योग्य नाही. व्याख्याने, कीर्तने, प्रवचने विद्वत्ताप्रचुर आणि आकर्षण असणे, मोठा श्रोतृसमुदाय गोळा होणे, ग्रंथसंपत्ती निर्माण करणे, हे काही पांडित्याचे खरे लक्षण नाही, ते केवळ शब्दज्ञान झाले. काही प्रमाणात त्याचाही उपयोग आहे; पण तेवढे पुरेसे नाही. संतांनीही ‘बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले’, असे म्हणून युधिष्ठिराने केलेल्या व्याख्येचेच समर्थन केले आहे.
गीतेने ‘जो समदर्शी त्याला पंडित म्हणावे’, असे सांगितले आहे. गीतेच्या आणि युधिष्ठिराच्या व्याख्येत वेगळेपणा मानण्याचे कारण नाही. आत्मज्ञान अनुभवाला येणे आणि ते कृतीत उतरणे, हा भाव दोन्हीकडे सारखाच आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)