‘साधकांनी त्यांच्या पितरांसाठी महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वीच देवाने पितरांना तृप्त केले’, या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !
‘२३.९.२०२४ या दिवशी दुपारी २.४५ वाजता मी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप करत होते. नामजपाला आरंभ केल्यानंतर साधारण २० मिनिटांनी मला पुढील दृश्य दिसले, ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात स्वयंपाकघराच्या बाजूच्या भिंतीकडील दोन रांगांमध्ये एकमेकांच्या समोर येतील, अशी जेवणाची पटले आणि आसंद्या मांडल्या आहेत. त्यांतील एका आसंदीवर आरंभी एक व्यक्ती येऊन बसली. लगेच दुसरी व्यक्ती आली. त्या दोघांनीही पांढरे शुभ्र कपडे घातले होते. मला त्यांचे चेहरेही दिसले; परंतु ते माझ्यासाठी अपरिचित होते. मी ‘या व्यक्ती कुठून येत आहेत ?’, हे पहाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भोजनकक्षाच्या बाहेरील बाजूला असलेल्या जिन्यात एकापाठोपाठ अनेक व्यक्ती उभ्या असलेल्या मला दिसल्या. त्या सर्वांनी पांढरे पोशाख परिधान केले होते. त्या वेळी ‘हे सर्व पितर आहेत’, हे माझ्या लक्षात आले. नंतर सर्व जण भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करतांना दिसले. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ते भोजनकक्षातून बाहेर पडले. बाहेर पडतांना प्रत्येकाच्या चेहर्यावर तृप्तीचे भाव दिसत होते.’
दुसर्या दिवसापासून, म्हणजे २४.९.२०२४ या दिवसापासून रामनाथी आश्रमातील साधकांच्या पितरांसाठी महालय श्राद्ध केले जाणार होते. यावरून प्रत्यक्ष श्राद्ध करण्यापूर्वी महालय श्राद्धविधीचे फळ पितरांना मिळत असल्याचे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. ही अनुभूती आल्यावर माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
केवळ गुरुदेवांच्याच कृपेने साधक पूर्णवेळ साधना करत आहेत आणि साधकांचा सर्व योगक्षेम गुरुदेव वहात आहेत. साधकांची क्षमता नसतांना त्यांना केवळ गुरुदेवांच्या कृपेने हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यात सहभागी होता येत आहे. साधकांच्या जीवनातील वैयक्तिक गोष्टीही परिपूर्ण करून त्यांची साधना सुकर होण्यासाठी गुरुदेवच साहाय्य करत आहेत.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कार्यात सहभागी होऊन आत्मोन्नती होण्यासाठी आम्हा साधकांचे सतत प्रयत्न व्हावेत आणि ते प्रयत्नही आपणच आमच्याकडून करून घ्यावेत’, अशी आम्हा सर्व साधकांची आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना !’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |