श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी रुग्णालयात भरती झाल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !
‘८ ते १४.८.२०२४ या कालावधीत माझ्या कटीतील (कमरेतील) तीव्र वेदनांवर उपचार करण्यासाठी मला गोव्यातील ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या वेळी मी अनुभवलेली गुरुकृपा आणि मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी साधकाची प्रेमाने विचारपूस करून औषधोपचार करणे
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यावर मला तेथील आधुनिक वैद्यांनी बाह्यरुग्ण विभागात तपासले आणि अन्य चाचण्या करण्यासाठी मला रुग्णालयात भरती केले. पहिल्या दिवसापासूनच तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. माझ्या कटीमध्ये (कमरेमध्ये) तीव्र वेदना होत होत्या. मला बसता आणि चालता येत नव्हते. मला रुग्णाचा पलंग दिला आणि मी त्यावर एकाच स्थितीत ८ दिवस झोपून होतो. तेथील सर्व जण माझी प्रेमाने विचारपूस करत होते आणि औषधोपचार वेळेवर देत होते. सर्व जण माझ्याशी प्रेमाने बोलत होते.
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नामजपादी उपाय करत आहेत’, असे साधकाला जाणवणे
‘माझा पलंग परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) खोलीत आहे. मी त्यांच्याच खोलीतील पलंगावर झोपलो आहे आणि ते माझ्या बाजूला बसून माझ्यासाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे मला प्रत्येक क्षणी जाणवत होते.
३. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी रामनाथी आश्रमातून साधकासाठी नामजपादी उपाय करणे
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका रामनाथी आश्रमातून माझ्यासाठी नामजपादी उपाय करायचे. सद़्गुरु काकांनी उपाय चालू केले की, मला त्याविषयी लगेच जाणवायचे. मी सौ. श्रावणीला (माझ्या पत्नीला) म्हणायचो, ‘‘सद़्गुरु काका माझ्यासाठी उपाय करत आहेत.’’ त्याच वेळी सद़्गुरु काकांचा ‘मी नामजप करत आहे’, असा लघुसंदेश यायचा. ‘परम पूज्य गुरुदेव माझ्यासाठी किती करत आहेत ! ते माझ्या समवेत आहेत. माझ्यासाठी उपाय करत आहेत आणि या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मला चैतन्यामध्ये ठेवले आहे’, असा विचार येऊन माझा भाव पुष्कळ जागृत व्हायचा.
४. गुरुकृपेने रुग्णालयातून सोडल्यावरही परिचारिकेने वेदनाशामक ‘सलाईन’ लावणे
ज्या दिवशी मला रुग्णालयातून सोडले, त्या दिवशी मी गाडी येण्याची वाट पहात पलंगावर झोपलो होतो. तेव्हा तेथे एक परिचारिका आली आणि मला म्हणाली, ‘‘तुम्हाला मी वेदनाशामक ‘सलाईन’ लावते. ते ‘सलाईन’ तुमची गाडी येईपर्यंत संपेल आणि ‘सलाईन’ घेतल्याने तुम्हाला प्रवासात त्रास होणार नाही.’’ गुरुदेवांनी त्या परिचारिकेच्या माध्यमातून माझी काळजी घेतली आणि खरोखरच माझ्या अन्य शरिराच्या भागात होणार्या तीव्र वेदना त्या सलाईनमुळे न्यून झाल्या.
५. रुग्णालयात असतांना आलेल्या अनुभूती
अ. माझा पलंग ठेवलेल्या भागातच मला प्रकाश दिसायचा आणि अन्य ठिकाणी अंधुक वातावरण दिसायचे.
आ. मला तीव्र वेदना होत असूनही गुरुदेव माझ्याकडून अखंड नामजप करून घेत होते. त्यामुळे माझे मन पुष्कळ आनंदी होते आणि मला पुष्कळ उत्साह जाणवायचा.
इ. माझी पत्नी सौ. श्रावणीला ‘आम्ही आश्रमातच आहोत’, असे सतत जाणवत होते.
ई. रुग्णालयातील वातावरणातही आम्हा दोघांचे साधनेचे प्रयत्न गुरुदेवांनी करून घेतले.
रुग्णालयात मला गुरुकृपा आणि गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला दिल्याविषयी मी परम पूज्य गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘अशीच कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू द्यावी’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |