‘पोर्ट ब्लेअर’चे ‘श्री विजयपुरम्’ कशासाठी ?
देशातील परकीय नावांऐवजी मूळ नावाचा अभिमान वाटणे आणि त्या नावांचा अंगीकार करणे, हे खर्या देशप्रेमाचेच लक्षण !
आपल्या देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव ‘श्री विजयपुरम्’ करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता. ‘श्री विजयपुरम्’ हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मिळवलेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान अन् निकोबार बेटांनी बजावलेल्या भूमिकेचे प्रतीक आहे.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘श्री विजयपुरम्’ नाव होण्यासाठी केलेले प्रयत्न !
‘पोर्ट ब्लेअर’चे ‘श्री विजयपुरम्’ हे नामांतरण व्हावे, यासाठी मी स्वत: पुष्कळ प्रयत्न केला होता. याविषयी सामाजिक माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. देहलीहून माझ्याकडे बेटांचा इतिहास समजावून घेण्यासाठी विचारणाही केली गेली होती. आज अंदमान-निकोबारच्या या राजधानीला अत्यंत सुयोग्य नाव प्राप्त झाले आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. – डॉ. सच्चिदानंद शेवडे
१. परकियांनी दिलेली नावे का पालटायला हवीत ?
ब्रिटीश भारत सोडून गेले त्याला आता ७७ वर्षे झाली, तरी आपण मात्र ब्रिटिशांनी इथे ठेवलेल्या जुन्या आठवणींना कवटाळून बसलो आहोत. ब्रिटिशांनी येथील गावे, शहरे, त्यांनी बनवलेल्या इमारती, पूल आणि बंदरे यांना त्यांचे अधिकारी, सैनिक अन् नेते यांची नावे दिली. ज्यांनी भारतावर प्रचंड अन्याय आणि अत्याचार केले, त्यांना दिलेले ते पुरस्कार होते. ते गुलामगिरीचे ओझे आपण आजही बाळगत आहोत. कदाचित् सवयीने किंवा सहनशीलतेने वा उपेक्षेनेही; परंतु जेव्हा जेव्हा अशी नावे पालटण्याचा विषय येतो, तेव्हा त्याला विरोधच केला जातो. ‘जी नावे वर्षानुवर्षे आपण वापरत आलो आहोत, ती ठीकच आहेत की. नावे पालटून असा काय मोठा फरक पडणार आहे’, असा एक उदासीन विचार सातत्याने मांडला जातो; पण ‘नाव पालटून काहीच होत नाही’, ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. नाव पालटल्याने पुष्कळ फरक पडतो. विशेषत: ज्या नावांना गुलामगिरीचा वास आहे, अत्याचार आणि अन्याय यांच्या आठवणी आहेत, ती नावे तर पालटायलाच हवीत; कारण परकियांनी दिलेल्या जखमा या व्रणासारख्या असतात. त्या आभूषणासारख्या मिरवयाच्या नसतात; परंतु आपण नेमके त्याकडेच दुर्लक्ष करतो. त्या स्थानाला, त्या नावाला चिकटलेले ते व्रण, त्या जखमा भरून यायला हव्यात. तसे झाले, तरच आपली अस्मिता आणि स्वत्व जागे होईल. या देशाविषयीचे जे प्रेम प्रत्येकाच्या मनाच्या कुपित बंद आहे, त्याला मुक्त मोकळा श्वास घेता येईल.
२. नाव पालटण्यामागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका
खरेतर परकियांनी दिलेली नावे पालटणे किंवा त्या इमारती पाडणे, हे जगाच्या इतिहासात नवीन नाही. रशियापासून स्वतंत्र झाल्यानंतर पोलंडनेही रशियाने बांधलेले चर्च तोडून त्याच जागी स्वत:चे नवीन चर्च बांधले होते; कारण त्यांना त्या चर्चशी जोडलेल्या कटू आठवणी पुसायच्या होत्या. ‘सिलोन’ हे नाव टाकून स्वत:चे ‘श्रीलंका’ हे नाव पुन्हा नव्याने व्यवहारात आणणे किंवा देशाच्या मूळ ‘म्यानम्यार’ या नावाचा अभिमान वाटणे आणि म्हणून त्या नावाचा अंगीकार करणे, हे खर्या देशप्रेमाचेच लक्षण आहे. ही काळाची आवश्यकता आहे.
नेमकी हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरली आणि ब्रिटिशांनी मागे ठेवलेल्या या गुलामगिरीच्या प्रतिकांची नावे पालटून त्यांना या भूमीची, या मातीतील नावे देण्याचे कार्य हाती घेतले. ही एकूण ५३७ बेटांची साखळी आहे. त्यातील केवळ २२ ते २५ बेटांवर वस्ती आहे. बाकी सर्व बेटे अद्याप मानवी स्पर्शापासून दूर आहेत. अंदमान निकोबारच्या या बेटांच्या शृंखलेत असलेल्या ‘हॅवलॉक बेट’, ‘नील आयलंड’ आणि ‘रॉस आयलंड’ या ३ बेटांची नावे वर्ष २०१८ मध्ये मोदींनी पालटली. ‘हॅवलॉक’ आणि ‘नील’ हे अत्यंत क्रूर ब्रिटीश अधिकारी होते. वर्ष १८५७ च्या युद्धात यांनी भारतियांवर अनन्वित अत्याचार केले होते. उत्तरप्रदेशातील कित्येक गावांमध्ये या सैतानांनी एकाही झाडाची एकही फांदी अशी ठेवली नव्हती की, जिथे हिंदुस्थानी माणूस फासावर लटकावलेला नव्हता. या त्यांच्या पराक्रमाचे परितोषिक म्हणून ब्रिटिशांनी या बेटांना त्यांची नावे दिली. मोदींनी ‘हॅवलॉक बेटा’ला ‘स्वराज बेट’, ‘नील आयलंड’ला ‘शहीद (हुतात्मा) बेट’ आणि ‘रॉस आयलंड’ला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ ही नावे देऊन त्या बेटांना चिकटलेला काळा इतिहास पुसला आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी या बेटांच्या साखळीतील २० बेटांना ‘परमवीरचक्र’ प्राप्त विरांची नावे बहाल केली आहेत आणि भारतियांचा अभिमान उंचावला आहे. याच भूमिकेतून केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी असलेल्या ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव पालटले असून हे आता ‘श्री विजयपुरम्’ या नावाने ओळखले जाणार आहे.
३. ब्रिटिशांनी ‘पोर्ट ब्लेअर’ हे नाव ठेवण्यामागील कारण
‘पोर्ट ब्लेअर’ शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रवेशकेंद्र आहे. ब्रिटिशांच्या नौदलातील एक सामान्य अधिकारी ‘आर्चीबाल्ड ब्लेअर’ यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले होते. डिसेंबर १७७८ मध्ये आर्चीबाल्ड ब्लेअर हा ‘एलिझाबेथ’ आणि ‘वायपर’ या २ जहाजांसह कोलकात्याहून अंदमानच्या पहिल्या सर्वेक्षणासाठी रवाना झाला. या मोहिमेच्या वेळी पूर्वेकडील किनार्याने उत्तरेकडे जातांना त्याची जहाजे एका नैसर्गिक बंदरावर पोचली. ब्लेअर यांना त्यांच्या शोधाचे महत्त्व लगेचच कळले आणि त्यांनी त्यांच्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल लिहिला. या अहवालाला ईस्ट इंडिया कंपनीतील अधिकार्यांनी पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या बेटांवर वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुढे या बेटाचे नाव ‘आर्चीबाल्ड ब्लेअर’ नावावर ठेवण्यात आले. मुख्यत: चाचेगिरीवर लक्ष ठेवणे इथून सहज शक्य होते. जहाज बुडाल्यास त्यातून वाचलेल्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इतर शक्तींशी शत्रूत्व झाल्यास त्यांचे अधिकारी आश्रय घेऊ शकतील, अशी जागा म्हणून हे स्थान सिद्ध करण्यात येणार होते; परंतु गंभीर आजार आणि मृत्यू यांमुळे ही नवीन वसाहत फार काळ टिकू शकली नाही.
४. ब्रिटिशांनी पोर्ट ब्लेअरमध्ये क्रांतीकारकांना कठोर शिक्षा देण्यासाठी उभारले ‘सेल्युलर जेल (कारागृह)’ !
वर्ष १८५७ च्या उठावाच्या काळात ब्रिटिशांनी असंख्य लोकांना कैद केले होते. त्यामुळे पोर्ट ब्लेअरचे त्वरित नूतनीकरण आणि दंड वसाहत म्हणून पुनर्वसन करण्यात आले. बहुतेक कैद्यांना पोर्ट ब्लेअर येथे जन्मठेपेची शिक्षा दिली जाई. त्या तुरुंगात अनेकांना फाशी देण्यात आली होती, तर अनेक जण रोग आणि प्रदेशातील खराब परिस्थिती यांमुळे मृत्यू झाला होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्य चळवळ तीव्र होत गेली, तेव्हा राजकैद्यांना ठेवण्यासाठी लवकरच अंदमानला एका मोठ्या ‘सेल्युलर कारागृहा’ची स्थापना करण्यात आली. ‘काळे पाणी’ या नावाने ओळखल्या जाणार्या या जीवघेण्या ‘सेल्युलर जेल’मध्ये वीर विनायक दामोदर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्यात आले होते आणि त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता. किंबहुना काळया पाण्याची शिक्षा भोगणारी व्यक्ती परत जीवित येतच नसे.
५. पोर्ट ब्लेअरला ‘श्री विजयपुरम्’ नाव देण्यामागील इतिहास
पोर्ट ब्लेअरला ‘श्री विजयपुरम्’ हे नाव देण्यामागे मोठा इतिहास आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पंतप्रधान म्हणून आझाद हिंद सेनेसह तिथे उतरले होते. ती बेटे जपान सरकारने नेताजींना, म्हणजेच भारत सरकारला दिली होती. नेताजींनी या बेटांवर मिळवलेला हा आपला पहिला विजय होता. नेताजी जेव्हा या बेटांवर आले, तेव्हा त्यांनी या बेटांना ‘स्वराज बेट’ आणि ‘शहीद बेट’ हे नावे दिली होती. दुसरे महत्त्वाचे, म्हणजे आपल्या असंख्य क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांनी तिथे शिक्षा भोगली आहे. आज स्वतंत्र भारताने हे नाव देऊन त्यांच्याविषयीची कृतज्ञताच व्यक्त केली आहे. अर्थातच या सार्या इतिहासाचा विचार करता या बेटाला ‘श्री विजयपुरम्’ हे नाव देऊन मोदींनी औचित्यच साधले आहे.
६. अंदमान निकोबारचे महत्त्व
या बेटांचे भौगोलिक महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अंदमान हे भारताचे खड्गहस्त व्हावे’, ही सूचना केली होती; परंतु सरकारचे त्याकडे बराच काळ दुर्लक्ष झाले. मधल्या काळात न्यूझीलंडने या भागात हात-पाय पसरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र भारत सरकारने स्वतःचा नौदल तळ तिथे वसवला. अर्थातच त्या अनुषंगाने त्या बेटांवर विमानतळ आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण केल्या आहेत. कोलकाता आणि चेन्नई ही दोन्ही राज्ये जवळ असल्यामुळे बंगाली अन् तमिळी लोकांची वस्ती लक्षणीय आहे; परंतु अलीकडे रोहिंग्या मुसलमान लोक इथे अतिक्रमण करू लागले असल्यामुळे सध्या शांत असलेला हा भाग पुढे अशांत होऊ शकतो. अर्थातच सध्याचे गृहखाते आणि पंतप्रधान मोदी इकडे नक्कीच जागरूकतेने पहात असतील.
मला निश्चितपणे वाटते की, जर एखादी गोष्ट चांगली होत असेल आणि ती कोणत्याही सरकारने केली, तरीही सर्वांनी एकत्र येऊन त्याला पाठिंबा दिला पाहिजे. उगाचच विरोधाला विरोध करू नये; कारण योग्य गोष्टीसाठी सर्वजण एकत्र आले, तर तो देश प्रगतिपथावर जायला मुळीच वेळ लागणार नाही.
(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’)