सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
१. एखादी सेवा मिळाल्यावर ‘मी त्यासाठी पात्र नाही’, असा विचार न करता ‘मला पात्र बनवण्यासाठी देवाने ती सेवा दिली आहे’, असा विचार करा !
सौ. नंदिनी सुर्वे : पूर्वी माझ्याकडे धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा होती. आता मला बालसंस्कारवर्ग आणि सुसंस्कारवर्ग घेण्याची सेवा मिळाली आहे. ती सेवा स्वीकारतांना माझ्या मनात ‘मी कुठेतरी न्यून पडते. देवाने मला ही सेवा दिली आहे; पण मी तेवढी पात्र आहे का ?’, असे नकारात्मक विचार येतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असा विचार करायला नको. तुम्हाला पात्र बनवण्यासाठी देवाने ती सेवा दिली आहे. एखाद्याला एखादी गोष्ट येते, तर त्याला देव तीच गोष्ट करायला कशाला सांगेल ? ज्याला शिकायचे आहे, त्याला देव सांगणार.
२. आपत्काळात आपत्काळाचे विचार मनात येऊन जप होणार नाही; म्हणून तो आताच करून घ्या !
सौ. नंदिनी सुर्वे : अयोध्येच्या मंदिरात श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यापासून माझे भावजागृतीचे प्रयत्न वाढले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान ! आपत्काळाच्या आधी सर्वांची आध्यात्मिक पातळी वाढली पाहिजे. आपत्काळात आपत्काळाचे विचार मनात येतील. जप होण्यास कठीण होईल. त्यामुळे आताच जप करून घ्या !