‘नंदीहळ्ळी, बेळगांव येथील श्री. उत्तम गुरव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे) यांना नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. ‘महाशून्य’ हा नामजप करणे
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप’ या ग्रंथाकडे पाहून नामजप करणे : ‘७.१.२०२४ या दिवशी संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटांंनी मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधलेला ‘महाशून्य’ हा नामजप एक हात आज्ञाचक्रावर आणि दुसरा हात अनाहतचक्रावर ठेवून करत होतो. मी माझ्यासमोर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप’ हा ग्रंथ ठेवला होता. माझे नामजपावर लक्ष केंद्रित होत नव्हते; म्हणून मी त्या ग्रंथाकडे पाहून नामजप करत होतो.
१ आ. सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : अनुमाने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मला सूक्ष्मातून दिसले, ‘आकाशमार्गे सर्व देवगण २ ओळीत समांतर अंतरावरून परिभ्रमण करत आहेत. प्रत्येकाच्या हातात फिकट पिवळ्या रंगाचे पुष्पहार आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आहेत. ते पाहून मला प्रश्न पडला की, ‘हे देवगण कुठे चालले आहेत ?’ नंतर त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले, ‘ते सर्व देवगण अयोध्येला श्रीरामलल्लाच्या दर्शनाला निघाले आहेत.’
२. प.पू. डॉ. आठवले यांनी काळानुसार सांगितलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करणे : अनुमाने ८ वाजून ३० मिनिटांनी माझा नामजप पूर्ण झाला आणि मी डोळे उघडले. तेव्हा मला फार आनंद झाला. माझ्या मनात आले, ‘मी ‘श्रीराम जयराम जय जय राम ।’ हा नामजप १४ वर्षे तोंडाने म्हणून हाताने लिहीत होतो. मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर प.पू. डॉ. आठवले यांनी काळानुसार मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करण्याविषयी कळवले. तेव्हापासून माझ्याकडून हा नामजप होत आहे.
‘गुरुदेवांनीच माझ्याकडून हे लिहून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. उत्तम गुरव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), नंदीहळ्ळी, बेळगाव. (७.१.२०२४)
|