Teesta Water Sharing : तिस्ता नदीच्या पाणी वाटपाविषयी भारताशी लवकरच वाटाघाटी ! – बांगलादेश
ममता बॅनर्जी यांनी वाटाघाटीला यापूर्वीच केला आहे विरोध !
ढाका – बांगलादेश लवकरच तिस्ता नदीच्या पाणी वाटपाविषयी भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पावले उचलेल, अशी माहिती बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या जलसंपदा विभागाच्या सल्लागार सईदा रिझवाना हसन यांनी दिली. ‘सामायिक नद्यांच्या पाण्यात बांगलादेशाचा न्याय्य वाटा’ या विषयावरील परिसंवादात हसन बोलत होत्या.
वर्ष २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ढाका दौर्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात तिस्ता नदीच्या पाणी वाटपाविषयी करार होणार होता; मात्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘तिस्ता नदीच्या पाणीवाटपामुळे बंगालमध्ये राज्यात पाणीटंचाई निर्माण होईल’, असे सांगत या कराराला विरोध दर्शवला होता.
बांगलादेशाच्या मागण्या स्पष्ट आणि ठामपणे मांडणार !
सईदा रिझवाना हसन पुढे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे; परंतु आवश्यक माहितीची देवाण-घेवाण राजकीय असू नये. एखाद्या देशाला पावसाची आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे. कोणताही देश या सूत्रावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकतर्फी जाऊ शकत नाही. बांगलादेशाच्या मागण्या स्पष्ट आणि ठामपणे मांडल्या जातील. देशाच्या अंतर्गत एकत्रितपणे नद्यांचे संरक्षण करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या महिन्याच्या आरंभी, बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस म्हणाले होते की, त्यांचे सरकार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तिस्ता पाणीवाटप कराराविषयी भारताशी असलेले मतभेद सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.