Mahalakshmi Murder Case : बेंगळुरू येथील तरुणीची हत्या करणार्या आरोपीची आत्महत्या
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात हत्येची स्वीकृती
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी नावाच्या महिलेली हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून ते शीतकपटात ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी मुक्तीरंजन प्रताप राय याने त्याच्या ओडिशा येथील भुईनपूर या गावी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने पत्र लिहून ठेवले होते. यात त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. बेंगळुरूचे पोलीस उपायुक्त शेखर टेक्कन्नवार यांनी ही माहिती दिली.
महालक्ष्मी तिच्या पतीला सोडून एकटी रहात होती. मुक्तीरंजन आणि महालक्ष्मी एकाच दुकानात काम करत होते. तेथे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महालक्ष्मीने विवाहासाठी मुक्तीरंजन याच्यावर दबाव निर्माण केला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महालक्ष्मीची हत्या उघड झाल्यापासून मुक्तीरंजन राय त्याच्या घरात नव्हता. त्यामुळे ही हत्या त्यानेच केली असावी, असा पोलिसांना संशय होता.