USA Sri Swaminarayan Mandir Vandalised : अमेरिकेत श्री स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड

हिंदूंनो, परत जा’ अशा लिहिण्‍यात आल्‍या घोषणा !

श्री स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड झाल्यावर एकत्र आलेले हिंदू

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील श्री स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्‍यात आली. ‘हिंदूंनो, परत जा’ अशी हिंदुविरोधी घोषणाही मंदिराच्‍या भिंतीवर लिहिण्‍यात आली. येथील जलवाहिनीची जोडणीही तोडण्‍यात आली. आक्रमण कुणी केले, हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. पोलीस अन्‍वेषण करत आहेत. १० दिवसांपूर्वी न्‍यूयॉर्कमधील मेलव्‍हिल येथील स्‍वामीनारायण मंदिराचीही विटंबना करण्‍यात आली होती.

१. मंदिराच्‍या प्रशासनाने या संदर्भात निवेदन प्रसारित करून म्‍हटले आहे की, अशा घटनांचा आम्‍ही कायम निषेध करू. अशा घटनांमुळे आम्‍ही अधिक दुःखी झालो आहोत. अंतःकरणात द्वेष असलेल्‍या प्रत्‍येकासाठी आमच्‍या प्रार्थना अधिक दृढ झाल्‍या आहेत,

२. सॅक्रामेंटा काऊंटीचे भागाचे प्रतिनिधित्‍व करणारे खासदार अमी बेरा यांनी याविषयी म्‍हटले की, सॅक्रामेंटा काऊंटीमध्‍ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला जागा नाही. आपल्‍या समाजातील या उघड कृत्‍याचा मी तीव्र निषेध करतो. आपण सर्वांनी असहिष्‍णुतेच्‍या विरोधात उभे रहायला हवे आणि आपल्‍या समाजातील प्रत्‍येकाला सुरक्षित वाटेल आणि त्‍यांचा आदर केला जाईल, याची निश्‍चिती केली पाहिजे.

३. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सिनेट न्‍यायिक समितीला पत्र लिहून कॅलिफोर्नियामधील अशा हिंदुविरोधी घटनांची तपशीलवार माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्‍ये हिंदूंच्‍या मंदिरांवर खलिस्‍तानी  आक्रमणे करत आहेत. हिंदू सहिष्‍णु असल्‍याने ते जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले, तरी अशा घटनांवर प्रत्‍युत्तर देणार नाहीत. दुसरे म्‍हणजे या दोन्‍ही देशांमध्‍ये खलिस्‍तान्‍यांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. भारत सरकार कारवाई होण्‍यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?