मांजर्ली (बदलापूर) स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध !
बदलापूर (जिल्हा ठाणे) – अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. अक्षय याचा मृतदेह कह्यात घेतल्यावर त्याच्या वडिलांच्या अधिवक्त्यांनी पुराव्यांसाठी तो दहन न करता पुरणार असल्याचे सांगितले. बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमीत अक्षयवर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध होता. पोलिसांनी मात्र अंत्यसंस्काराला कुणीही विरोध करू शकत नाही, असे म्हटले आहे.
अक्षय शिंदे ठार झाल्याचे वृत्त येताच बदलापूर येथे लोकांनी पेढे वाढले आणि फटाके फोडले, असे समजते. त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली. ही चकमक आणि बदलापूर लैंगिक शोषण या संदर्भात संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘एस्.आय.टी.’ (विशेष चौकशी पथकाद्वारे) चौकशी करण्याचा आदेश देण्याची विनंती त्याच्या वडिलांनी याचिकेत केली आहे.