मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींकडून प्रश्नांची सरबत्ती !
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरण
मुंबई – अक्षय शिंदे चकमक प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. अक्षय शिंदेला कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि चकमक झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण उच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितले. घायाळ पोलीस अधिकार्याचे वैद्यकीय अहवाल आणि ‘विशिष्ट अतंराने गोळीबार केला कि पाँईंट ब्लँक रेंज गोळीबार केला’ याचा फॉरेन्सिक अहवालही न्यायालयाने मागवला आहे.
‘पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली ? ती आधीच ‘लोड’ कशी काय होती ? कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो’, असे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण न्यायालयात म्हणाले. त्यावर सरकारी अधिवक्त्यांनी ‘झटापटीत पिस्तुल ‘लोड’ झाली’, असे सांगितले.
‘त्याच्या हाताला बेड्या होत्या का ?’ असे न्यायमूर्तींनी विचारल्यावर सरकारी अधिवक्ते म्हणाले, ‘‘त्याच्या हाताला बेड्या होत्या; पण त्याने पाणी मागितले.’’
‘स्वसंरक्षणाकरता पायावर गोळी मारली जाते’, असे न्यायमूर्तींनी विचारल्यावर सरकारी अधिवक्त्यांनी ‘‘पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली’’, असे सांगितले.
‘‘अक्षयची बंदूक हिसकावण्याची क्षमताच नव्हती. त्या दिवशीच दुपारी तो शांत आणि स्वस्थ होता. त्याने आम्हाला मनीऑर्डर मिळण्याविषयी आणि जामिनाविषयी विचारणा केली. त्यामुळे त्याच्या मनात असे काही टोकाचे कृत्य करण्याचे विचार आहेत, असे कोणतेच चिन्ह आम्हाला दिसले नाही’’, असा युक्तीवाद अक्षय याच्या वडिलांचे अधिवक्ते अमित काटरनवरे यांनी सुनावणीच्या वेळी केला.