श्रीमन्नारायणाशी संबंधित भावजागृतीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री ११.३० वाजता मला ‘नामजप करावा’, असे वाटले. माझा ‘निर्गुण’ हा नामजप आपोआप चालू झाला. माझा श्रीमन्नारायणाच्या (श्री तिरुपति बालाजी यांच्या) प्रती असणारा भाव जागृत होऊ लागला आणि नामजप करतांना मी श्रीमन्नारायणाशी संबंधित भावजागृतीचा प्रयोग करू लागले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. अपाला औंधकर

१. मला सूक्ष्मातून तानपुर्‍याचा (तंबोर्‍याचा) सुंदर नाद स्पष्टपणे ऐकू येऊ लागला.

२. मी ‘तिरुपति बालाजीच्या मूर्तीच्या मागे कान लावून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो का ?’, हे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला आनंद जाणवू लागला.

३. शिवाचे दर्शन होणे

३ अ. त्या वेळी अकस्मात् भगवान शिव मला म्हणाला, ‘माझे तुझ्याकडे लक्ष आहे’ आणि त्याने स्मितहास्य केले.

३ अ १. त्या वेळी प्रथम माझे डोळे आणि हात यांना अन् नंतर माझ्या संपूर्ण देहाला पुष्कळ थंडावा जाणवू लागला. मला शिवतत्त्व जाणवून माझ्या डोळ्यांसमोर पांढरा प्रकाश पसरला.

३ आ. भगवान शिवाने नटराज रूपात दर्शन देणे : त्यानंतर मला दिसले, ‘मी भूमीत खोल जात आहे. तिथे मला एक शिवपिंडी दिसली. मी शिवपिंडीवर एक बिल्वपत्र अर्पण केले. त्या वेळी भगवान शिव त्या पिंडीतून प्रकट झाला. त्याने मला नटराज रूपात दर्शन दिले.’ मला पुष्कळ आनंद झाला. माझ्या संपूर्ण देहात थंडावा जाणवत होता. माझ्या शरिराला बाहेरून थंड वार्‍याची झुळुक जाणवत होती.

४. श्रीमन्नारायणाचे दर्शन होऊन त्यानंतर हरि-हर यांचे दर्शन होणे : त्यानंतर मला पुन्हा श्रीमन्नारायणाचे दर्शन झाले. श्रीमन्नारायणाने मला बोलावले. मला तेथे ‘हरि-हर’ (नारायण आणि शिव) या दोघांचेही दर्शन झाले. माझी दोघांनाही पाहून भावजागृती झाली. मी दोघांच्याही चरणी नतमस्तक झाले.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे दिव्य अनुभूती येणे : त्यानंतर माझ्या मनात ‘मी ही दिव्य अनुभूती कुणामुळे अनुभवू शकले ?’, असा विचार येताच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या डोळ्यांसमोर आले आणि मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

५ अ. मी श्रीविष्णूचे स्मरण केल्यावर मला शिवतत्त्व अनुभवता येते. मी शिवाचे स्मरण केल्यावर मला श्रीविष्णुतत्त्व अनुभवता येते. त्यानंतर मला दोन्ही देवतांचे दर्शन होते.

६. कृतज्ञता : हे हरिहर स्वरूप गुरुदेवा, आपल्या कृपेविना ही आनंददायी अनुभूती येणे शक्यच नाही. हे कृपाळू गुरुमाऊली, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.८.२०२३)