श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म !
आपल्या घराण्यातील देहांत झालेल्या (आधीच्या किमान ३ पिढ्यांपर्यंतच्या) सर्व पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचा पक्ष (पंधरवडा) म्हणजे पितृपक्ष. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म. याचा भाव अत्यंत कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे.
आपल्याकडे ब्रह्मयज्ञ, दैवयज्ञ, पितृयज्ञ, भौतयज्ञ आणि नृयज्ञ असे ५ महत्त्वाचे यज्ञ सांगितले आहेत.
अ. ब्रह्मयज्ञ : वेदादि शास्त्राध्ययन
आ. दैवयज्ञ : देवपूजा आणि यजन
इ. पितृयज्ञ : श्राद्ध पक्षादि
ई. भौतयज्ञ : प्राणी, पक्षी यांना अन्नांश देणे (गोग्रास, काकबलि इत्यादी)
उ. नृयज्ञ : अतिथी सत्कार
यातील पितृयज्ञाचाच एक भाग म्हणजे पक्ष आणि श्राद्धकर्मे विधीयुक्त करणे !
१. कुलवृद्धी, कुलक्षय रक्षण आणि कौटुंबिक सुस्वास्थ्य यांसाठी श्राद्ध करणे महत्त्वाचे !
तुमच्या कुलदेवता आणि पितर यांना तुमच्या कुळाचा भारी अभिमान असतो. त्यामुळे त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षाही असतात. त्यामध्ये दिरंगाई न करता ते ते कर्म कर्तव्यबुद्धीने आणि श्रद्धेने करणे, हे कुलवृद्धी, कुलक्षय रक्षण आणि कौटुंबिक सुस्वास्थ्य यांसाठी अत्यंत हितकारी असते.
२. कव्य (अन्न) पितरांना कसे पोचते ?
तुम्ही जे शास्त्रोक्त मंत्रोच्चारणासह असलेले कव्य (अन्न) पितरांना अर्पण करता, ते कव्यवाहन – अग्नी ज्या लोकात जो पितृ जे अन्न भक्षण करतो, तेथे नेऊन त्याच्या अन्नामध्ये परिणत (समाविष्ट) करवून तिथे त्याला प्राप्त करवतो. मग तो देव, पितर, यक्ष, गंधर्व असा देवकोटीतील अथवा वाघ, सिंह, हत्ती, कावळा, गरुड असा पशुपक्ष्यांच्या योनीतील अथवा भूत, पिशाच्च इत्यादींपैकी किंवा पुन्हा मनुष्य असा काहीही झालेला असो. ज्याप्रमाणे भारतीय रुपया मुद्रा विनिमय विभागाद्वारे डॉलर, युरो, पाऊंड, दिनार इत्यादीमध्ये योग्य मूल्यात रूपांतरित केला जातो, काहीसे तसेच !
३. श्राद्ध पक्ष कधीही व्यर्थ जात नाही !
‘जर पितृ मुक्त झाला असेल तर ?’, अशी शंका येऊ शकते. अशा स्थितीत पितृलोकाची मुख्य देवता ‘अर्यमा’ ही ते कव्य ग्रहण करते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते. तुमचे श्राद्ध पक्ष कधीही व्यर्थ जात नाहीत, हे पक्के !
४. श्राद्ध पक्षाविषयीचे काही चुकीचे तर्क आणि त्याचे उत्तर
अ. तर्क : काहींचा असा तर्क असतो, ‘श्राद्ध पक्ष करण्यापेक्षा आम्ही गरिबांसाठी, अनाथांसाठी, वृद्धाश्रमियांसाठी इत्यादी अन्नदान किंवा तत्सम कल्याणकारी काहीतरी करतो.’
उत्तर : ही जी कर्मे आहेत; ती निश्चितच पुण्यकारक, लोकोपयोगी आणि प्रशंसनीय होत, हे निर्विवाद; पण म्हणून श्राद्ध पक्ष अकर्तव्य ठरत नाहीत. जसे मी तहान लागली, तर पाणी पितो आणि भूक लागली, तरी अन्नाच्या ऐवजी अन्नाच्या सम प्रमाणात पाणीच पितो, असे म्हणणे किंवा तुमच्याकडे कुंड्यांत काही झाडे लावलेली असतील आणि तुम्ही काही प्राणीही पाळले असतील अन् तुम्ही ठरवले की, झाडांच्या वाट्याचे अन्नोदक त्यांच्या वाट्यासह आपल्या पशूंनाच द्यावे किंवा उलट प्रकारे तर ते तर्कसंगत ठरेल का ? श्राद्ध पक्षाविषयीही तसेच आहे. म्हणून श्राद्ध पक्षाऐवजी उपरोक्त केलेल्या सत्कर्माचे पुण्य जरी नक्की मिळाले, तरी पक्ष-श्राद्ध टाळण्याचे पाप माथी चढणार हेही अटळच ! तस्मात् विधीयुक्त पक्ष-श्राद्ध करणे, हे गृहस्थाचे पवित्र कर्तव्यच आहे, हे सदैव ध्यानात ठेवावे.
आ. तर्क : काहींचा असाही तर्क असतो, ‘बघा ! आयुष्यभर आईबापांशी भांडभांड भांडला आणि दोघेही मेल्यानंतर मात्र मारे पक्ष-श्राद्ध करण्याचे ढोंग करत आहे. वा रे वा ! पितर याचे कव्य (अन्न) मुळीच स्वीकारणार नाहीत.
उत्तर : हे योग्यच की जिवंतपणी मातापित्यांशी प्रेम, आदराने आणि आज्ञाधारकाप्रमाणेच वागायला हवे; पण पापबुद्धिवशात् तसे न घडले, तरी आता तो पक्ष-श्राद्ध करत असेल, तर म्हणावे, ‘आता तरी श्रद्धेने करत आहे ना ! ईश्वर त्याचे भले करो.’ म्हणजे जिवंतपणी मातापित्यांशी निष्ठुरपणे वागणारा त्यांच्या मृत्यूनंतर श्राद्ध पक्षाच्या अधिकारापासून वंचित होत नाही. कदाचित् भयापोटी वा लोकापवादापोटीही तो पक्ष-श्राद्ध करत असेल, तर त्यास अव्हेरू नये. सत्कर्म करत आहे, हे पहावे.
५. श्राद्ध पक्ष न चुकवता करणे महत्त्वाचे !
मी असे सांगू इच्छितो की, एक वेळ दसरा, दिवाळी यांना सुट्टी न मिळाली वा रजा न काढली, तरी चालेल; पण पक्ष-श्राद्धाला चुकवू नका. त्यासाठी अवश्य पुरेसा वेळ द्या. वेळ काढा.
‘आम्ही भगवान रामकृष्णादीकांना मानतो; पण त्यांचे सांगणे आणि आचरण मानत नाही’, अशी सध्या एक आस्तिकांची भ्रष्ट परंपरा फोफावत आहे. उदाहरणार्थ भरताकडून पितृदेहांताची वार्ता कळताच प्रभु श्रीरामाने वनवासात असतांना उचित अशा फळाच्या गराचे पिंड बनवून पित्यासाठी मंत्रोच्चारासहित श्राद्धकर्म संपन्न केले. भगवान परशुराम यांनी तर शत्रूच्या रक्तयुक्त जलाने पितरांचे तर्पण केले. महाराज युधिष्ठिराने महाभारताच्या युद्धातील दोन्ही पक्षांतील कोट्यवधी मृत विरांसाठी श्राद्धकर्म केले, तर अर्जुनाने यादवीत संपलेल्या कोट्यवधी मृत यदुविरांचे श्राद्ध आणि तर्पण करवले. आधुनिक काळाचे आणि नोकरी – व्यवसायाचे कारण पुढे करून किंवा पत्नीची / पतीची साथ यात मिळत नाही, हे कारण पुढे करून चालणार नाही. ती आत्मवंचनाच आहे, हे आस्तिकांनी लक्षात घ्यावे.
तात्पर्य : आपले हे पक्ष – श्राद्ध संपादनाचे पवित्र कर्तव्य सर्व संबंधितांनी अवश्य बजावावे; हीच साग्रह विनंती ! आणखी एक महत्त्वाचे म्हणजे या पितृपक्ष पंधरवड्यात कोणतेही मांगलिक कार्य न करावे, हे ठीक; पण आत्मकल्याणाचे परमार्थ साधन केल्याखेरीज राहू नये, हेही विसरता कामा नये. ते अवश्य करावेच करावे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.