हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

  • हुपरी येथील आंदोलनकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले

  • हिंदुत्वनिष्ठांचे उपोषण स्थगित

हुपरी येथे आंदोलनस्थळी महाआरती करणारे हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – हुपरी येथील अवैध मदरशाचा वापर सुन्नत जमियतने करू नये; केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नगर परिषद प्रशासनाने २५ सप्टेंबरला जमियतच्या मुख्य फलकावर लावली. अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले. ही जागा नगरपालिकेची आहे, असा फलक लावण्यात येईल, असे लेखी पत्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर तहसीलदारांच्या हस्ते फळांचा रस घेऊन २५ सप्टेंबरला हिंदुत्वनिष्ठांचे उपोषण स्थगित करण्यात आले. अवैध मदरशावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नितीन काकडे, राजेंद्र पाटील, प्रशांत साळोखे आणि प्रतापराव भोसले यांनी नगर परिषद हुपरीसमोर २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबरला महाआरती !

२४ सप्टेंबरला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी महाआरती करण्यात आली. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाचे निर्णय !

२४ सप्टेंबरला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत प्रशासनाच्या बैठका झाल्या. या बैठकीसाठी प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक एन्.आर. चौखंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २४ सप्टेंबरला रात्री १२ पर्यंत प्रशासनाशी चर्चा चालू होती; मात्र समाधानकारक तोडगा निघाला नव्हता. मदरशात जाण्यास मुसलमान समाजाला प्रतिबंध करण्याची नोटीस समाजाच्या अध्यक्षांना बजावणे, मदरशातील वीज तोडण्याची नोटीस आस्थापनास देणे, न्यायालयाच्या मनाई आदेशाचा १ ऑक्टोबरच्या निर्णयानंतर अतिक्रमण काढणे. त्यासाठी न्याचिका प्रविष्ट करणे असे निर्णय प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत घोषित केले.

प्रशासनाने केलेल्या विविध कारवायांचे पत्र हिंदुत्वनिष्ठांना देतांना, तहसीलदार आणि अन्य अधिकारी

आंदोलन थांबवावे ! – पोलीस

या संदर्भात हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी एक पत्र दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत भारतातील अतिक्रमित जागेतील बांधकाम निष्कासित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोपर्यंत बांधकाम निष्कासित करू शकत नाही. यापुढील कारवाई ही न्यायालयाचा या संदर्भातील कोणता आदेश येतो ? यानंतर घेण्यात येईल. तरी आपण आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र देण्यात आले होते.

अवैध बांधकाम भुईसपाट होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार !

आंदोलन सोडल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि उपोषणकर्ते यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले, ‘‘आज आम्ही केवळ उपोषण स्थगित केले आहे. १ ऑक्टोबरपर्यंत सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रशासन पुढे काय निर्णय घेते, त्यावर आमची पुढील दिशा ठरेल ! हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील अवैध मदरसा संपूर्ण भुईसपाट होईपर्यंत आमचा लढा चालू राहील !’’

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा लढ्यासाठी सक्रीय पाठिंबा आणि ३ दिवस हुपरीत तळ

उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच हुपरी येथील अवैध मदरसा तोडण्यासाठी २३ सप्टेंबरपासून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते गेले ३ दिवस हुपरीत तळ ठोकून होते. यात प्रामुख्याने शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वीर शिवा काशीद प्रतिष्ठान, मनसे, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, अधिवक्ता समीर मुद्गल, अधिवक्ता केदार मुनीश्वर यांसह अन्य संघटनांचा समावेश होता. उपोषणकर्त्यांच्या ठाम भूमिकेमुळे, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या रेट्यामुळे प्रशासनालाही आंदोलकांसमवेत चर्चा करून कारवाई करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आणि अवैध मदरशाचा वापर प्रतिबंधित करावा, यांसाठी पावले उचलावी लागली.