आश्रमातून घरी गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधिकेला सत्संग मिळून चैतन्य आणि आनंद मिळाल्यामुळे आलेल्या अनुभूती अन् व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘नोव्हेंबर २०२१ मध्ये माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना भेटण्याच्या उद्देशाने मी संभाजीनगर येथे गेले होते. आमच्या घरात आध्यात्मिक त्रास असल्याने, तसेच मलाही तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने अनेकदा मला अस्वस्थ वाटत असे. कोरोना महामारी असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अनेक साधकांचा सत्संग लाभला. तेव्हा साधकांच्या गुरुदेवांप्रती असलेल्या भावामुळे माझा त्रास उणावून मला त्यांच्या सत्संगाचा भावसत्संगाप्रमाणे लाभ झाला. ‘आपत्काळात परात्पर गुरुदेव आणि साधक यांचे स्मरण अन् त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव हीच संजीवनी आहे’, असे जाणवून परात्पर गुरुदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त झाली. या वेळी विविध साधकांना भेटल्यावर माझा आध्यात्मिक त्रास उणावला आणि मला चैतन्य मिळाले, याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. दैवी सुगंध येणे
घरी गेल्यावर पहिले काही दिवस माझ्याजवळ असलेल्या ‘बॅगां’मधून मला दैवी सुगंध येत होता. तेव्हा ‘या सुगंधाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, असे जाणवून मला काही त्रास झाला नाही.
२. मावस बहिणीला रुग्णालयात घेऊन गेले असता आलेल्या अनुभूती
२ अ. बहिणीला रुग्णालयात घेऊन गेले असता श्री रेणुकामातेचे दर्शन होणे आणि प्रसिद्ध संत प.पू. अप्पा महाराज यांचे दर्शन होऊन त्रास उणावणे : ३ – ४ दिवसांनी घरी झालेल्या एका कौटुंबिक वादामुळे मला मानसिक त्रास होत होता. त्याच वेळी माझी मावस बहीण रुग्णाईत असल्याने मी तिला घेऊन रुग्णालयात गेले होते. तेथे जवळच श्री रेणुकामातेचे मंदिर आहे. मी तिचे दर्शन घेऊन परत येत असतांना तेथील प्रसिद्ध संत प.पू. अप्पा महाराज यांचे मला दर्शन झाले आणि मला होणारा त्रास उणावला. तेव्हा ‘त्या संतांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर आले आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. साधिकेशी परात्पर गुरु डॉक्टर यांच्याविषयी बोलणे झाल्यावर हलकेपणा, चैतन्य आणि आनंद अनुभवायला मिळणे : एकदा मी माझ्या मावस बहिणीसह वैद्यांकडे गेले असतांना तेथील साधिका सौ. अनिता लटपटे यांच्याशी माझी भेट झाली. ‘मी रामनाथी आश्रमातून आले आहे, म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच भेट झाली’, असा साधकांचा भाव असतो. आम्ही परात्पर गुरुदेवांबद्दल बोलल्यानंतर तेथील वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे जाणवले. परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना आम्हाला हलकेपणा, चैतन्य आणि आनंद अनुभवायला मिळाला.
३. साधिकेला भेटायला गेल्यावर तिच्या दाराशी परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
एकदा मी एका नातेवाइकाला घेऊन आधुनिक वैद्यांकडे गेले होते. तेव्हा मी साधिका सौ. चंदा पत्की यांच्याकडे गेले. त्या वेळी मला ‘त्यांच्या दाराशी पांढर्या रंगाची बंडी आणि पायजमा घातलेले परात्पर गुरु डॉक्टर उभे आहेत’, असे जाणवले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
४. साधिकांशी बोलत असतांना आलेल्या अनुभूती
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलत असतांना दैवी सुगंध येणे : संभाजीनगर येथील साधिका सौ. पत्की आणि सौ. नीला पाडळकर यांच्याशी परात्पर गुरुदेवांविषयी बोलत असतांना आम्हा तिघीनांही दैवी सुगंध आला. सौ. नीला पाडळकर यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने थकवा जाणवत होता; परंतु ‘परात्पर गुरुदेवांविषयी बोलून झाल्यावर त्यांना पुष्कळ बरे वाटू लागले’, असे त्यांनी सांगितले.
४ आ. साधिकांच्या ठिकाणी श्री महालक्ष्मीचे दर्शन होऊन आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे : आम्ही बोलत असतांना मला त्या दोघींमध्ये श्री महालक्ष्मीचे दर्शन झाले आणि पांढरा प्रकाश माझ्या दिशेने आल्याचे मला जाणवले. तेव्हा त्यांच्या भेटीनंतर माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे जाणवले.
५. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांमुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन चैतन्य जाणवणे
मी संभाजीनगरमध्ये साधारण ३ आठवडे होते. तेव्हा मी सायंकाळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीकेंद्रावर जात असे. तेथे असलेले सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांतील चैतन्यामुळे माझा त्रास उणावून माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय व्हायचे आणि मला चैतन्य मिळायचे. तसेच तेथील साधकांशी बोलल्यावर माझा मानसिक त्रास उणावत असे अन् माझ्या अडचणीही सुटत असत.
६. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनावर गेल्यावर ‘वातावरणात ज्ञानलहरी आणि आनंदलहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवून आध्यात्मिक त्रास उणावणे
जिल्ह्यात दत्तजयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन लागले होते. त्या दिवशी पाैर्णिमा असल्याने मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते; परंतु सनातनच्या ग्रंथप्रदर्शनावर गेल्यावर मला आईच्या कुशीत गेल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या साधकांशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना मला चैतन्य जाणवून हलके वाटू लागले. तेथे मी जवळजवळ २ ते ३ घंटे थांबले. साधक जिज्ञासूंना ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची माहिती सांगत असतांना ‘वातावरणात ज्ञानलहरी आणि आनंदलहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. त्यातून माझा त्रास उणावून मला चैतन्य जाणवले आणि मी आनंदाने घरी गेले.
‘हे गुरुदेवा, साधकांच्या रूपात तत्त्वरूपाने राहून मला सत्मध्ये ठेवले आणि मला चैतन्य अन् आनंद दिल्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२३)
|