साधकांसाठी नामजपादी उपाय परिणामकारक रितीने व्हावेत, ही तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८७ वर्षे) !
‘सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु मंगळुरू येथे रहातात. त्या साधकांसाठी नामजप करतांना साधकही त्यांच्या समवेत बसून नामजप करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना त्यांच्या नामजपादी उपायांचा लाभ होत आहे. त्यांच्या नामजपाच्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. राधा प्रभुआजी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. स्वतः नामजपादी उपायांच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करून साधकांवरही तो संस्कार करणे : पू. प्रभुआजी उपायांच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करतात आणि ‘साधकांनीही वेळेचे काटेकोर पालन करावे’, यासाठी प्रयत्न करतात. प्रसारातील काही साधकही नियमितपणे या नामजपादी उपायांसाठी येतात. पू. आजी त्यांना उपायांना वेळेत येण्याचे महत्त्व सांगून त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात. एखादा साधक उशिरा आला, तर त्या चुकीची प्रेमाने जाणीव करून देतात. त्यामुळे साधकांमध्ये नामजपादी उपायांचे गांभीर्य वाढले आहे.
१ आ. साधकांना नामजपादी उपायांचा लाभ व्हावा, ही तळमळ असणे : नामजपाच्या वेळी ‘साधकांचा नामजप होऊन त्यांना अधिकाधिक आध्यात्मिक लाभ व्हावा’, याची पू. आजींना अधिक तळमळ असते. काही साधकांना नामजपाच्या वेळी झोप येते. तेव्हा पू. आजी त्या साधकाच्या शेजारी बसलेल्यांना त्याविषयी सांगून त्या साधकाला उठवायला सांगतात.
१ इ. साधकांवर प्रार्थनेचे महत्त्व बिंबवून त्यांना भावपूर्ण प्रार्थना करण्यास शिकवणे : नामजपादी उपायांना आरंभ करण्यापूर्वी त्या साधकांना प्रार्थना सांगतात. ‘ही प्रार्थना भावपूर्ण रितीने सांगितली जावी’, या दृष्टीने पू. आजी साधकांना दिशा देतात आणि त्यातील बारकावेही सांगतात. एखाद्या साधकाकडून प्रार्थना भावपूर्ण रितीने सांगितली गेली नाही, तर पू. आजी त्याला अन्य साधकाकडून ती शिकून घ्यायला सांगतात. ‘उपायांच्या आधी भावपूर्ण प्रार्थना केल्याने पुढील एक घंट्याचे उपाय परिणामकारक होतात’, असे त्या सांगतात. ‘प्रार्थना आणि प्रार्थनेला उपस्थित राहिल्याने उपायांचा लाभ कसा होतो’, याचे महत्त्वही पू. आजी सांगतात.
२. पू. राधा प्रभु यांच्या नामजपादी उपायांमध्ये जाणवलेले पालट
२ अ. निर्गुण स्तरावरचे उपाय होणे : काही मासांपासून ‘पू. आजी नामजप करत असतांना त्यांच्या माध्यमातून निर्गुण स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला अनुभवायला येते.
२ आ. मारक शक्ती कार्यरत झाल्यामुळे उपाय परिणामकारक होणे : ‘पू. आजींच्या नामजपादी उपायांमधून मारक शक्ती कार्यरत होते’, असे वाटते आणि ‘त्यामुळे उपाय परिणामकारक होतात’, असे माझ्या लक्षात आले.
३. पू. राधा प्रभु यांच्या नामजपादी उपायांमुळे झालेले लाभ
अ. पूर्वी उपायांच्या वेळी मला झोप यायची. पू. आजींच्या उपायांना नियमित बसल्याने ‘मला होणारे त्रास आता न्यून झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
आ. ‘माझ्या नामजपाची गुणवत्ता वाढली असून आता नामजप एकाग्रतेने होतो.
‘पू. राधा प्रभु यांच्या नामजपादी उपायांना बसण्याची संधी मला मिळाली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१५.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |