Badlapur Encounter : सर्वसाधारपणे तुम्ही डोक्यात गोळी मारता का ? – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्‍न

बदलापूर – सर्वसाधारपणे तुम्ही डोक्यात गोळी मारता का ? कि हातावर किंवा पायावर मारता ? आरोपीला घेऊन जाणार्‍या गाडीत जे पोलीस अधिकारी होते, पूर्णपणे प्रशिक्षित आणि पारंगत होते. ४ पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला, हे समजणे थोड कठीण आहे. रिव्हॉल्व्हर चालवणे, हे सामान्य माणसाला शक्य आहे का ?, असे प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यावर त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. त्यावर न्यायलयात सुनावणी झाली.

न्यायालयाने म्हटले की,

१. आमचा पोलिसांच्या कारवाईविषयी काही प्रश्‍नच नाही; परंतु जे सत्य आहे, तसेच पोलिसांच्या गाडीत जे काही घडले, ते समोर येणे अत्यावश्यक आहे.

२. अक्षय शिंदेला जी गोळी झाडली, ती किती अंतरावरून झाडली ? ती अक्षयच्या शरिराच्या कोणत्या भागावर लागली ? कोणत्या भागातून बाहेर गेली ? अक्षय शिंदे याच्यावर ज्यातून गोळी झाडली, त्या रिव्हॉल्व्हरचा ‘फॉरेन्सिक रिपोर्ट’ सादर करा. या सर्व गोष्टी फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट होतील.