VHP Protest Against Temples Govt Control : मोगल आणि ब्रिटीश यांच्याप्रमाणेच सरकारांकडूनही मंदिरांची लूट !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषद आंदोलन करणार

विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन

नवी देहली – देशातील राज्य सरकारांकडून मंदिरावर नियंत्रण आणले जात असून सरकारने नेमलेल्या समितीकडून भ्रष्टाचार होत आहे. मोगल आणि ब्रिटीश यांच्या राजवटीत मंदिरांची लूट करण्यात आली, तशीच लूट सरकारांकडूनही केली जात आहे. याविरोधात विश्‍व हिंदु परिषद आंदोलन करणार आहे, अशी माहिती विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ‘हिंदूंचा पैसा हिंदूसाठी’, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. आंदोलनामध्ये प्रत्येक राज्याच्या राजधानीत मोर्चा काढला जाईल, तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सुरेंद्र जैन पुढे म्हणाले की,

मंदिरे हिंदूंच्या हातात द्या !

ज्यांना सरकारमध्ये सामावून घेता येत नाही, अशा नेत्यांना मंदिर समितीवर नेमण्यात येते. ही सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. सरकारच्या नियंत्रणात असलेली मंदिरे पुन्हा समाजाच्या नियंत्रणात देणे, हाच या समस्येतून मुक्ती मिळवण्याचा पर्याय आहे. समाज संतांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची देखभाल करण्यास सक्षम आहे. तमिळनाडू सरकारच्या नियंत्रणात जवळपास ४०० हून अधिक मंदिरे आहेत. मागच्या १० वर्षांत या मंदिरांची ५० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली.

मुसलमान त्यांच्या धार्मिक संस्था चालवतात मग हिंदू का नाही ?

सरकारने मंदिरांवर नियंत्रण ठेवणे, हे राज्यघटनेच्या कलम १२ अनुसार अयोग्य आहे. ‘राज्याला धर्म नसतो’, असे यात म्हटले आहे. मग राज्य सरकारला मंदिराचे नियंत्रण करण्याचा अधिकार कोण देतो ? कलम २५ आणि २६ द्वारे आम्हाला आमच्या संस्था चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर मुसलमान त्यांच्या धार्मिक संस्था चालवू शकतात, तर हिंदू का नाही ?

संपादकीय भूमिका

प्रथम देशातील भाजपशासित राज्यांतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झाली पाहिजेत. ती झाली की, अन्य राज्यांमध्ये हिंदूंना संबंधित सरकारांवर दबाव निर्माण करणे सोपे जाईल !