Sri Lankan New President Anura Kumara Dissanayake : भारत आणि चीन यांच्यामध्ये ‘सँडविच’ बनणार नाही !

श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांचे विधान

(‘सँडविच बनणार नाही’ म्हणजे दोन्ही देशांचा दबाव स्वीकारणार नाही.)

श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेला कोणत्याही जागतिक राजकीय लढाईत अडकायचे नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणार नाही किंवा वर्चस्वासाठी लढणार्‍या कोणत्याही देशाला पाठिंबा देणार नाही. आम्ही भारत आणि चीन यांच्यामध्ये ‘सँडविच’ बनणार नाही, असे विधान श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटले आहे. ‘दोन्ही देश आमचे चांगले मित्र आहेत. मला आशा आहे की, भविष्यात आमची भागीदारी चांगली राहील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ‘मोनोकल’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

दिसानायके पुढे म्हणाले की, आम्ही युरोपीयन युनियन, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांच्याशी चांगले संबंध ठेवणार आहोत. श्रीलंकेचे परराष्ट्र धोरण निष्पक्ष असेल. आमच्यावर २८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणे, हे माझे प्राधान्य आहे.