महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता !
मुंबई – राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा राज्यस्तरीय शिखर समितीने संमत केला आहे. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग यांसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये देण्यात येणार आहेत. २४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, साहाय्य अन् पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शिखर समितीने संमत केलेल्या कामांमध्ये भगूर (जिल्हा नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मठिकाणी त्यांच्या जीवनावर आधारित ‘थीमपार्क’ साकारण्यात येणार आहे. यासाठी ४० कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात यातील १५ कोटी रुपये वितरीत करण्याला मान्यता देण्यात आली आहे. अमळनेर (जिल्ह जळगाव) येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा ‘मंगळग्रह देवस्थाना’च्या २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जिल्हा बीड) विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. यासह २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाच्या वेळी अजमल कसाब या आतंकवाद्याला जिवंत पकडणार्या हुतात्मा तुकाराम ओंबाळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे येथील मूळगावी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपये निधी संमत करण्यात आला आहे.