उत्पन्नवाढीसाठी एस्.टी.महामंडळ चालक-वाहक यांना देणार प्रोत्साहन भत्ता
मुंबई – उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अधिकाधिक उत्पन्न आणणारे चालक आणि वाहक यांचा एस्.टी. महामंडळ ‘रोख प्रोत्साहन भत्ता’ देऊन गौरव करणार आहे. यामध्ये प्रत्येक फेरीचे उत्पन्न उद्दिष्ट दिले जाणार आहे. ते पूर्ण करून अतिरिक्त उत्पनातील २० टक्के रक्कम चालक आणि वाहक यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.
इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एस्.टी. महामंडळाने ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ सहस्र रुपये लाभ मिळवला आहे.
गैरवर्तणूक करणार्यांना प्रोत्साहन भत्ता नाही !
प्रवाशांशी गैरवर्तणूक अथवा उत्पन्नवाढीसाठी अवैध मार्गाचा वापर करणार्या चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना पुढे चालू ठेवण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे एस्.टी. महामंडळाने सांगितले.