नौसेना दिनानिमित्त करण्यात आलेल्या खर्चात कोणताही गैरव्यवहार नाही ! – प्रशासनाची स्पष्टोक्ती
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – मालवण येथे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासकीयदृष्ट्या खर्चाची तरतूद करण्यासाठी विशेष गोष्ट म्हणून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या संमत निधीतून एक वेळची विशेष बाब म्हणून ५ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नौसेना दिनानिमित्त करण्यात आलेल्या खर्चात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विविध स्तरांवर करण्यात येत होता, या पार्श्वभूमीवर प्रशासनाची स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशभरातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे वास्तव्य होते. या निधीचा वापर निवास व्यवस्था, विद्युत् व्यवस्था, वाहने भाड्याने घेणे, चित्रीकरण करणे, चहापाणी, बंदोबस्ताच्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांचे अधिग्रहण करणे, भोजन, स्टेशनरी यांकरता करण्यात आला आहे. या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित यंत्रणांकडून शासनास सादर केली आहेत. या उपयोगिता प्रमाणपत्राविषयी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष शासनमान्य निधीहून अल्प निधी खर्ची पडला आहे, ही वस्तूस्थिती आहे, असे प्रशासनाने कळवले आहे.