सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
भुईबावडा घाटात ७ ठिकाणी दरड कोसळली
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २३ सप्टेंबर या दिवशी चालू झालेला मुसळधार पाऊस २४ सप्टेंबर या दिवशीही पडत होता. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली, तसेच सखल भागात पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस असाच चालू राहिला, तर भातपिकाची हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२४ सप्टेंबरला पडलेल्या पावसामुळे कुडाळ शहरातील टपाल कार्यालय ते एस्.टी. बसस्थानक हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. वैभववाडी तालुक्यात भुईबावडा घाटात ७ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तसेच रस्त्याचा काही भाग कोसळला. संपूर्ण घाटातील गटारे दगड-मातीच्या गाळाने भरली आहेत. २३ सप्टेंबरपासून घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाट रस्त्यावरील दरडी हटवण्याचे काम प्रशासनाने चालू केले आहे.
सावंतवाडी तालुक्यात पाडलोस, माडाचेगाळू आणि न्हावेली, रेवटेवाडी येथील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. मडूरा, पाडलोस, न्हावेली भागांतील भातशेती पाण्याखाली गेली आहे. तुळस-सावंतवाडी मार्गावर होडावडा येथे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.
जामसंडे-देवगड भागात गणेश नगर परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या भागात गेली अनेक वर्षे पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असूनही प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
कुडाळ रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे ४ सप्टेंबरला उद्घाटन, २४ सप्टेंबरला गळती
कुडाळ रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले. या भागाला विमानतळासारखे प्रेक्षणीय बनवण्यात आले असून ४ सप्टेंबर या दिवशी याचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाला अद्याप एक महिनाही पूर्ण झालेला नसतांना २४ सप्टेंबर या दिवशी पडलेल्या पावसात स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या छताला गळती लागल्याचे निदर्शनास आले. पाणी सारखे गळू लागल्याने सुशोभीकरणासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार कि काय ? अशीही चर्चा आता चालू झाली आहे.
माणगाव खोर्यातील मोरे येथील धोंडी खरात घरी जात असतांना मार्गातील ओढा ओलांडत होते. त्या वेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते वाहून गेले. त्यानंतर काही कालावाधीनंतर खरात यांचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून जवळच सापडला.