श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ पुरस्काराने सन्मानित !

मुंबई – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांचे सहअध्यक्ष आणि औसा येथील नाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘आफ्टरनून व्हॉईस मुंबई’ यांच्याकडून ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘आफ्टरनून व्हॉईस’च्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. वैदेही ताम्हण उपस्थित होत्या.

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पंढरपूर येथे भाविकांना दिलेल्या सेवासुविधा, तसेच नाथ संस्थानचे अध्यक्ष म्हणून वारकरी संप्रदायातील पूर्वापार चालत आलेली परंपरा टिकवून पुढे नेण्यासाठी केलेले कार्य आणि वारकरी संप्रदायातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. औसेकर महाराज यांना यापूर्वी ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मराठवाडा भूषण’, ‘धर्म केसरी’ यांसह अन्य पुरस्कार मिळाले आहेत.