शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात विविध कामांना वेग !
कोल्हापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सिद्धता जोरात चालू असून स्वच्छतेसह अन्य कामे वेगात चालू आहेत. मुख्य मंदिराच्या समोर असलेला गरुड मंडप उतरवण्याचे काम पूर्ण झाले असून येथील स्वच्छताही २ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. मुंबईतील ‘आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनास हे स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. दीपमाळा, शिखरे, देवतांची मंदिरे आणि सगळ्यांत शेवटी गाभार्याची स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता झाल्यावर श्री महालक्ष्मीदेवीच्या नित्यालंकारांसह विशेष करून नवरात्रोत्सवात पूजेसाठी परिधान करण्यात येणार्या सोने आणि चांदीच्या दागिन्यांची स्वच्छताही करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सव काळात राज्यातून लाखो भाविक श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येतात. होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर्शनरांगेचे बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी विनामूल्य चप्पल स्टँड व्यवस्था, लाडू प्रसाद केंद्र यांचीही संख्या वाढवण्यात येत आहे.