सुखाची गुरुकिल्ली !
मनुष्य सोडून सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती हे देवाने नेमून दिलेले कार्य पूर्ण क्षमता वापरून करतात. ते कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत. ‘मी’पणा मिरवत नाहीत. त्यांच्याकडून चुका कधीच होत नसतात. त्यामुळे त्यांना दोष लागत नाहीत. त्यांच्याकडून देवाचे १०० टक्के आज्ञापालन घडत असते; कारण जणू त्यांना देवाची आज्ञा जन्मजात ठाऊक असते.
मनुष्याकडून मात्र भरपूर चुका होत असतात. देवाच्या आज्ञा सोडूनच द्या, त्याला ‘मनुष्यजन्माचा उद्देश’ही ठाऊक नसतो. त्याला ‘त्याची कर्तव्ये काय ?’, हेही ठाऊक नसते. याचे कारण जन्मजात त्याला त्याचे ज्ञान प्राप्त होत नसते. केवळ उन्नत व्यक्ती, म्हणजे ज्याची मागील जन्मातील साधना असते, त्यांनाच हे ज्ञान जन्मजात असते. इतरांना लहानपणापासून शिकवावे लागते; परंतु सध्याचे पालक किंवा शिक्षक हे ज्ञान त्यांच्या मुलांना देऊ शकत नाहीत; कारण तेच याविषयी अनभिज्ञ असतात. पूर्वीच्या काळी हे मनुष्यजीवनाचे, साधनेचे ज्ञान गुरुकुलामधून प्राप्त व्हायचे; मात्र सध्या अशी व्यवस्थाच नाही.
सध्या शाळेत, महाविद्यालयात केवळ व्यावहारिक शिक्षण दिले जाते. हिंदूंना आध्यात्मिक शिक्षण पूर्णपणे वगळले गेलेले आहे. त्यामुळेच मनुष्याच्या अधोगतीला आरंभ झालेला आहे. सरकारने व्यावहारिक आणि आध्यात्मिक शिक्षण, तसेच राष्ट्ररक्षण यांचे, म्हणजेच सैनिकी शिक्षण यांचे धडे दिले जातील, अशी गुरुकुले निर्माण केली पाहिजेत.
सुखी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने साधना करून क्रियमाण वापरायला हवे. प्रयत्न न करता प्रारब्धावर सर्व भाग सोडला, तर जीवनभर दुःखाला सामोरे जावे लागेल. प्रयत्न केल्यावर फळाची अपेक्षा नको. जे चांगले फळ मिळते ती देवाची कृपा होय आणि जे दुःख मिळते ती देवाची इच्छा समजायला हवी. अशा विचारांमुळेच मनुष्य सतत सुखी आणि आनंदी राहू शकतो. हीच सुखाची गुरुकिल्ली आहे !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.