जीवनोद्धार करणारे भारतीय शिक्षण !
२४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत, संतांची अनमोल शिकवण आणि नैतिकता अन् आदर असल्याने अत्याचार किंवा दुराचार यांना स्थान नसणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ५५)
भाग ५४. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/836897.html
प्रकरण १०
५. भारतियांविषयी विदेशींनी काढलेले गौरवोद्गार !
अ. एरियन (दुसर्या शतकातील ग्रीक इतिहासकार) : असत्य भाषण करणारा भारतीय आजपर्यंत कुणाला आढळला नाही.
आ. स्ट्रेबो (इतिहासकार) : भारतीय इतके प्रामाणिक आहेत की, त्यांना कुलुपे लावण्याची किंवा करार बंधनकारक करण्यासाठी ते लेखी करण्याची आवश्यकता वाटत नाही.
इ. ह्यु-एन-त्संग (चिनी प्रवासी) : प्रामाणिकपणा आणि सरळपणा या गुणांत हिंदु लोक पुष्कळ श्रेष्ठ आहेत. त्यांच्या राज्यव्यवस्थेत हेच गुण दिसून येतात. ते अन्यायाने केव्हाही कुणाचे द्रव्य हरण करत नाहीत.
ई. इद्रिसी (अकराव्या शतकातील भूगोल लेखक) : हिंदु लोक इतके न्यायी, प्रामाणिक आणि एकवचनी आहेत की, त्यांच्या गुणांची कीर्ती ऐकून अनेक नागरिक चोहोंकडून त्या देशात जाऊन रहातात.
उ. अबुल फजल : आपल्या सर्व व्यवहारांत हिंदु लोक सत्य आणि प्रामाणिकपणा यांना पराकाष्ठेचा मान देतात.
ऊ. कर्नल स्लीमन : परस्परांशी व्यवहार करतांना लबाडी वा असत्य भाषण करण्याचे भारताच्या खेड्यांतील लोकांना ठाऊकच नाही. माझ्यापुढे शेकडो खटले असे आले होते की, आरोपी खोटे बोलला, तरच त्याची मालमत्ता, स्वातंत्र्य आणि प्राण वाचतील; पण अशा आणीबाणीच्या वेळीसुद्धा आरोपीने खोटे बोलण्याचे स्वच्छ नाकारले. कर्नल साहेबांची ही बहुमोल प्रशस्ती उद्धृत करून मॅक्समुल्लर विचारतो, ‘‘असे उद्गार इंग्लंडमधील इंग्रजांविषयी किती न्यायाधीश लोकांच्या तोंडून निघतील ?’’
ए. प्रो. मॉनियर विल्यम्स : हिंदु लोकांपेक्षा धार्मिक आणि कर्तव्यनिष्ठ लोक मला युरोपात कुठेही आढळले नाहीत.
ऐ. एल्फिन्स्टन : इंग्लंडच्या शहरातील सामान्य श्रेणीचे लोक जितके नीतीभ्रष्ट असतात, तितके हिंदूंमधील अगदी कनिष्ठ वर्गही नीतीभ्रष्ट नाहीत. सर जी. कँबेलचा शेरा विलक्षणच आहे, तो म्हणतो, ‘जितका अधिक काळ एखादा हिंदुस्थानचा प्रांत आमच्या हातात आलेला असतो, तितका तो अधिकाधिक रितीने सार्वत्रिक अन् गंभीरतेची लबाडी आणि खोटेपणा करू लागतो.’
ओ. मॅगस्थेनिसला भारतियांचे शौर्य, धैर्य आणि पातिव्रत्य हे गुण पाहून अन् गुलामगिरीचे नावही येथे नसल्याचे पाहून आश्चर्य वाटते. हिंदुस्थानात दास्यत्व कधीच नव्हते. संस्कृत भाषेत ‘गुलाम’ शब्दाला प्रतिशब्दसुद्धा नाही. दास हा शब्द ‘गुलाम’ या अर्थाचा नाही.
उपरोक्त सर्व उतारे कै. बाबाराव सावरकर लिखित ‘हिंदु राष्ट्र’ या पुस्तकातील आहेत.
बाबाराव पुढे म्हणतात, ‘एकमेकांशी सभ्यतेचे वर्तन, आदरसत्कार, परोपकार नि विशेषतः स्त्रियांशी विश्वास, आदर नि मार्दवयुक्त वर्तन ठेवणे, हे गुण अंगी असणे, ही जर सुधारलेल्या समाजाची लक्षणे असतील, तर या गोष्टीत हिंदु लोक कोणत्याही युरोपीय राष्ट्रांहून अल्प नाहीत. उलट अनेक पटींनी श्रेष्ठच आहेत.’
शिक्षणाची आवश्यकता आणि भारतीय शिक्षणशास्त्राची वैशिष्ट्ये !
१. धर्म म्हणजे काय ?
भारतात श्रेष्ठ जीवनमूल्ये, श्रेष्ठांकडून शिकायला मिळत असत; म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १५८), म्हणजे ‘या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक ‘धर्म’ असे म्हणतात.’ वडील-श्रेष्ठ-थोर मंडळी जे आचरण करतात तो धर्म ! शेवटी शिक्षण कशासाठी ? मनुष्याचे सामाजिक जीवन श्रेष्ठ प्रतीचे, आनंदाचे, निश्चिंततेचे असावे यासाठीच ना ?
२. आजच्या शिक्षणातून गुंड निर्माण होणे
आज शिक्षण हे उपजीविकेचे साधन झाले आहे; पण कित्येक जण शिक्षण एका विषयाचे घेऊन पदवीधर होतात आणि धंदा तिसराच करतात. खरे तर आजच्या शिक्षणाने गुंड घडवण्याचेच काम हाती घेतले आहे. अल्प शिकलेल्यांत मोठे गुंड क्वचित् सापडतील.
३. पूर्वी स्त्री-पुरुषांचे एकत्र आणि एकरूप शिक्षण नसण्यामागील कारण
स्त्री-पुरुषांचे एकत्र आणि एकरूप शिक्षण हा प्रकार पूर्वी नव्हता. ज्या किशोरावस्थेत परस्परांविषयी आकर्षण उत्पन्न होते, ज्या युवावस्थेत परस्परांचे आकर्षण तीव्र वासनेत रूपांतरित होते, त्या अवस्थांमध्ये स्त्री-पुरुषांना एकत्र खेळायला, फिरायला, वावरायला, सान्निध्यात असायला संमती देण्याने दुष्प्रवृत्ती वाढतील कि नाही ? शुकासारखे वैराग्यशील किती ? भारतीय संस्कृतीने गेल्या सहस्रो वर्षांत केलेल्या संस्कारांमुळे गेल्या ३ – ४ पिढ्या याही अवस्थेत अल्प भ्रष्ट झाल्या. स्वैराचाराला उपयुक्त वातावरण निर्माण करणे आणि स्वैराचाराला बंदी करणे, हे स्फोटक वातावरणालाच जन्म देणारे ठरते. आज हे स्फोट सर्वत्र चालू आहेत.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)