Free Hindu Temples Peethadhipati Mantralaya : सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत ! – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

कर्नाटकातील तीर्थक्षेत्र ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री यांची मागणी !

‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

रायचूर (कर्नाटक) : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंच्या प्रकरणी कर्नाटकातील तीर्थक्षेत्र ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री यांनी म्हटले की, श्री तिरुपती मंदिर हिंदूंचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान असून प्रसादामध्ये भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याची सरकारने समग्र चौकशी करावी. हे कुणाच्या दायित्वशून्यतेमुळे झाले आहे ? कधीपासून होत आहे ? आदींची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. अन्याय करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. यासह सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत. याविषयी कायद्याची कार्यवाही करावी, असे मागणी केली आहे.

पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री पुढे म्हणाले की, मठ आणि मंदिरे प्रत्येक प्रांतातील भाविकांची श्रद्धाकेंद्रेच असून ती त्यांच्या परंपरेशी संबंधित आहेत. हे राष्ट्राच्या राजधानीत किंवा राज्याच्या राजधानीत बसलेले कुणीतरी चालवू शकत नाही. मंदिरांच्या कारभारात सरकारने ढवळाढवळ करणे योग्य नाही. तेथील पावित्र्य आणि परंपरा पालटण्याचा अधिकार सरकारला नाही.

(म्हणे) ‘मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राज्यांनी नाही, तर केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे !’ – कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी

मंत्री रामलिंगा रेड्डी

सुबुधेंद्र श्रींच्या विधानावर मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, कर्नाटकात १ लाख ८० सहस्र मंदिरे आहेत. यांपैकी ३४ सहस्र मंदिरे धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येतात. ते आजपासून नाही, तर इंग्रजांच्या काळापासून आहे. मठ कोणत्याही सरकारच्या अधीन नाहीत. मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करून स्वतंत्र व्हावीत, हे राज्य सरकारचे काम नाही, तर यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे. (‘खोटे बोल; पण रेटून बोल’ यावृत्तीचे काँग्रेस सरकारचे मंत्री ! रेड्डी हिंदूंना मूर्ख समजत आहेत, असे त्यांना वाटते का ? मंदिरे केंद्र नाही, तर राज्य सरकर कह्यात घेते आणि घेतली आहेत. धर्मादाय विभाग राज्याच्या अंतर्गत येत असल्याने मंदिरे राज्य सरकारच्यात नियंत्रणात आहेत, हे स्पष्ट आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त होण्यासाठी सर्व संतांनी, तसेच धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. तसेच मंदिरे चालवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली पाहिजे !