पंढरपूर येथील रिक्शाभाडे, तसेच अन्य तक्रारी करण्यासाठी लवकरच प्रादेशिक परिवहन विभागाचा स्वतंत्र ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा क्रमांक !

श्री. अजय केळकर, सोलापूर

सोलापूर – पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी प्रतिदिन २५ ते ३० सहस्र भाविक येतात. या भाविकांकडून रिक्शाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करतात. यामुळे राज्यातून, तसेच परराज्यांतून येणार्‍या भाविकांची लूट होते. रेल्वेस्थानकापासून मंदिराकडे जाण्यासाठी १०० रुपयेही मागितले जातात. शहरात विविध ठिकाणी उपनगरात जाण्यासाठी नागरिकांनाही या अडचणी येतात. पंढरपूर येथील रिक्शांना भाडेआकारणी करण्यासाठी ‘मीटर’ नसल्याने ही अडचण भेडसावते. या लुटीच्या संदर्भात नेमकी तक्रार कुणाकडे करायची ? असा प्रश्‍न भाविकांना होता. पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे वारकरी, भाविक यांना जर रिक्शाभाडे, तसेच अन्य कोणत्या तक्रारी करावयाच्या असतील, तर त्यासाठी ८-१० दिवसांत प्रादेशिक परिवहन विभाग एक ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा क्रमांक घोषित करणार आहे.

या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी पंढरपूर येथे जाऊन वारकरी आणि प्रवासी यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर रिक्शाचालकांडून आकारण्यात येणार्‍या अवास्तव भाड्याविषयी सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला असता परिवहन विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा क्रमांक घोषित करणार असल्याचे सांगितले.

‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रारी नोंदवाव्यात ! – गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

गजानन नेरपगार

प्रवाशांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आम्ही लवकरच ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा क्रमांक घोषित करत असून यावर प्रवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील. आषाढी वारीच्या कालावधीत रिक्शाचालकांकडून वारकर्‍यांना योग्य ते भाडे आकारले जावे, यासाठी आम्ही विविध पथके नियुक्त केली होती, तसेच ठिकठिकाणी फलक लावले होते. या फलकांवर किती अंतरासाठी किती भाडे आकारणी करावी ? याची माहिती देण्यात आली आहे. हे फलक अधिक संख्येने शहरात लावण्यात येतील.