Kolkata HC Durga Puja Donation : दुर्गा पूजा समित्यांना १० लाख रुपये द्या !  

  • कोलकाता उच्च न्यायालयाची बंगाल सरकारला सूचना

  • सरकारकडून देण्यात येणारे ८५ सहस्र रुपये तुटपूंजे असल्याचे मत

कोलकाता (बंगाल) – दुर्गा पूजा समित्यांना सरकारकडून मिळणारी ८५ सहस्र रुपयांची रक्कम नाममात्र आहे. यामुळे आयोजकांना मंडपासाठी कितीतरी पटींनी अधिक किंमत मोजावी लागली असती. सरकारने प्रत्येक दुर्गा पूजा समितीला किमान १० लाख रुपये देण्याचा विचार करावा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिला. सरकारकडून दुर्गा पूजेच्या आयोजकांना दिल्या जाणार्‍या रकमेवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील सूचना केली.

‘पूजा समित्यांना मिळणार्‍या साहाय्याचा कोणताही हिशेब नाही. अशा परिस्थितीत त्यांना हे आर्थिक साहाय्य देणे बंद करावे’, अशी मागणी याचिकाकर्त्या अधिवक्त्या नंदिनी मित्रा यांनी केली आहे; मात्र उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा कोणताही बंदीचा आदेश दिला नाही.

१. सुनावणी करतांना मुख्य न्यायाधीश टी.एस्. शिवग्ननम् म्हणाले की, मी गेल्या २ वर्षांत अनेक दुर्गा पूजा मंडपांना भेटी दिल्या. मला असे वाटते की, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खर्च केलेल्या खर्चाच्या तुलनेत ८५ सहस्र रुपये काहीच नाहीत. तथापि पूजा समित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने निधी वितरित केला पाहिजे; कारण दुर्गा पूजा हा राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. त्यामुळे राज्याने प्रत्येक दुर्गा पूजा आयोजकाला १० लाख रुपये देण्याचा विचार करावा, असे बंगाल सरकारची बाजू मांडणारे अ‍ॅडव्होकेट जनरल किशोर दत्ता यांना सांगितले.

२. मुख्यन्यायाधीश पुढे म्हणाले की, सरकारकडून मिळालेला पैसा कुठे खर्च होतो ?, हे पहावे लागेल. समित्यांना पैसे मिळाले, तर ते या रकमेचा उपयोग कसा करतात ?, हेही पहावे लागेल.

३. या याचिकेत पूजा मंडपात वीज शुल्कात मिळणारी सूट थांबवण्याचीही मागणीही करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने हीसुद्धा मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, प्रकाशयोजनेवरील खर्चातून सूट मिळणे, हे सार्वजनिक उद्दिष्ट असू शकते; कारण मंडपामधील प्रकाश व्यवस्था मूलभूत पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या उत्सवासाठी सरकारला आर्थिक साहाय्य वाढवून देण्याची सूचना प्रथमच दिली गेल्याचे दिसून येत आहे. असा विचार होणे हिंदूंसाठी चांगली घटना म्हणावी लागेल !