कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने गंभीर आजारांचे वेळेपूर्वी निदान !

छायाचित्रात डॉ. फारुख काझी

मुंबई – मुंबई विद्यापिठाने प्रामुख्याने महिलांमधील आणि अन्य गंभीर आजार  यांचे आगाऊ निदान करण्यासाठी काही रुग्णालयांच्या साहाय्याने कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेलचा विकास करण्याची योजना हाती घेतली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्यामुळे कर्करोगासारख्या अनेक आजारांचे वेळीच निदान होणे शक्य होत आहे. तसेच साथरोगादी आजारांची वेळीच कल्पना मिळून त्यांना अटकाव करण्यात साहाय्य होऊ शकते. महिलांमधील स्तनांचा, तसेच गर्भाशयाचा कर्करोग या सारख्या दुर्धर आजारांसाठीही हे ‘कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेल’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुंबई विद्यापिठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डॉ. फारूख काझी यांनी व्यक्त केला.

विशिष्ट काळात उद्भवणार्‍या आजारांची माहिती गोळा करून त्यांचे विश्लेषण केल्यामुळे ही माहिती उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यातून महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेल विकसित करण्यात येईल, असे डॉ. काझी यांनी सांगितले.

अलीकडेच लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अल्गोरिदमची जोड देऊन ट्रायकॉर्डर नावाची संगणक आज्ञावली सिद्ध केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य डॉक्टरांनाही स्टेथोस्कोपच्या साहाय्याने हृदयाच्या संदर्भातील निदान वेळीच करणे शक्य झाले आहे. याची संवेदनक्षमता ९१ टक्के, तर अचूकता ८८ टक्के आहे. यामुळे हृदयाकडून होणार्‍या रक्तपुरवठ्याची माहिती मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.