विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !
गोव्याच्या शिक्षण खात्याने परिपत्रकाद्वारे दिली चेतावणी
पणजी, २३ सप्टेंबर (वार्ता.) – विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे मानसिक छळ केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी शिक्षण खात्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. कामुर्ली येथे एका शाळेत विद्यार्थ्यांना पट्टीने अमानुष मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली होती आणि या प्रकरणी २ शिक्षिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने हे परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षेच्या संदर्भात एकही कृती घडू नये, असे (‘झिरो टॉलरन्स’) धोरण असले पाहिजे. विद्यार्थ्यांकडून मारहाणीविषयी तक्रार आल्यास त्यावर त्वरित कारवाई करावी लागणार आहे. शाळांच्या व्यवस्थापनांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी याविषयी कार्यशाळा घ्यावी अन् विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे. सर्व शाळांच्या व्यवस्थापनांनी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सूचनांचे गंभीरपणे पालन करावे.