श्राद्धाऐवजी अन्य कर्म केले, तर तिथे श्राद्धाचे पुण्य लाभणार नाही !
पितृपक्षाच्या निमित्ताने…
घरपट्टी, वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.), आयकर (इन्कम टॅक्स) वगैरे कर सरतेशेवटी सरकारी तिजोरीत जमा होतात; पण घरपट्टी ‘जी.एस्.टी.’च्या कार्यालयात, तर आयकर हा नगरपालिका कार्यालय स्वीकारत नाही, तसेच श्राद्धाचे आहे. पितरांना उद्देशून जे समर्पण करायचे आहे, ते समंत्रक आणि योग्य पद्धतीने दिले, तर त्यांच्यापर्यंत निश्चित पोचते. श्राद्धाऐवजी अनाथाश्रमाला वगैरे पैसे दिले, तर अन्नदानाचे पुण्य लाभते; पण श्राद्धाचे पुण्य १०० टक्के लाभणार नाही. ‘याऐवजी ते करूया’, हे चुकीचे आहे. ‘मी पथकर (टोल) भरतो, म्हणजे घरपट्टी भरली नाही, तरी चालते’, हे जसे चालत नाही, तसेच ‘श्राद्धाऐवजी अन्य कर्म केले, तर तिथे श्राद्ध पुण्य लाभणार नाही.’
प्रत्येक कर्माचे फळ आणि त्यांचे कार्यक्षेत्र शास्त्राने निश्चित केलेले आहे. आपण मनाला वाटते, तसे केल्याने गोंधळ होईल बाकी काही होणार नाही. घरपट्टी, आयकर, विक्रीकर, मोटार वाहनावरील कर हे वेगवेगळे आहेत. आपल्या स्थावर जंगम उत्पन्नातील काही भाग हा प्रतिवर्षी त्या त्या करांकरता व्यय करणे अनिवार्य आहे. गाडी घेतांना मोटार वाहनावरील कर भरला; म्हणून पथकर चुकत नाही. जे कर्म आवश्यक आहे, ते करावेच लागते. आयुष्य, सुप्रजा, धन, विद्या, स्वर्ग, मोक्ष, भौतिकसुखे आणि राज्य पितरांच्या कृपेने मिळते. ज्या पूर्वजांनी वेळप्रसंगी झिजिया कर, अगदी शेंडी-जानवे धारण करण्यासाठी कर भरून यवन आणि ख्रिस्ती (पोर्तुगीज, ब्रिटीश) यांचे अत्याचार सहन करून स्वतःची हिंदु म्हणून ओळख टिकवली, स्वतःचे आचार-विचार, संस्कृती टिकवली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायची कि चेष्टा करायची ? हा विचार सर्वस्वी तुमचा आहे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.९.२०२४)