पितरलोकाची व्याख्या आणि त्याचे प्रकार
१. पितरलोकाची व्याख्या
‘ज्या लिंगदेहांचे अन्य लोकांतील स्थान निश्चित झालेले नाही अथवा पुनर्जन्मासाठी काही कालावधी आहे, तसेच काही कर्मदोषांमुळे काही काळापुरते अडकलेले लिंगदेह ज्या लोकात तात्पुरत्या स्वरूपात वास करतात, त्या सूक्ष्म लोकाला ‘पितरलोक’, असे म्हणतात.
२. पितरलोकाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
२ अ. साधकांशी संबंधित पितरलोक : ज्या साधकांनी काही काळ तरी निष्काम, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी साधना केली आहे आणि त्यांचे अन्य लोकांतील स्थान काही कारणास्तव निश्चित झालेले नाही, अशा साधकांना मृत्यूनंतर ‘साधकांशी संबंधित पितरलोकात’ स्थान मिळते. या लोकाला ईश्वराचे सुरक्षाकवच असते. त्यामुळे येथील लिंगदेहांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. परिणामी अनिष्ट शक्तींना या लोकातील लिंगदेहांना स्वतःच्या नियंत्रणात घेता येत नाही. येथे अतिशय सूक्ष्मरित्या या लिंगदेहांच्या रक्षणाचे कार्य चालते.
२ आ. पुण्यशील जिवांसाठीचा पितरलोक : आयुष्यभर इतरांना अन्नदान करणारे, गोमातेची सेवा करणारे, इतरांना विविध प्रकारे निःस्वार्थ हेतूने साहाय्य करणारे पुण्यशील लिंगदेह या पितरलोकात असतात.
२ इ. कनिष्ठ पितरलोक : आयुष्यभर इतरांना त्रास न देणारे, आपले जीवन नेटाने जगणारे, काही प्रमाणात देवाला मानणारे सज्जन व्यक्तींचे लिंगदेह या लोकात असतात.
२ ई. नीच पितरलोक : आयुष्यभर साधना न करणारे; परंतु एक-दोन प्रसंगात चांगले आणि मोठे पुण्यप्रदान करणारे कर्म केल्याने त्यांना या लोकात स्थान मिळते.
३. पुण्यशील जिवांचा पितरलोक, कनिष्ठ आणि नीच पितरलोकातील लिंगदेहांच्या रक्षणासाठी दत्तगुरूंचे गण असणे आणि त्यांच्या मर्यादा
‘पुण्यशील जिवांसाठीचा पितरलोक’, ‘कनिष्ठ पितरलोक’ आणि ‘नीच पितरलोक’ येथील लिंगदेहांचे रक्षण करण्यासाठी दत्तगुरूंचे गण असतात. ते लहान-सहान अनिष्ट शक्तींपासून या लोकातील लिंगदेहांचे रक्षण करतात; परंतु त्याहून मोठ्या अनिष्ट शक्तींचे आक्रमण झाल्यास गणांना लिंगदेहांचे रक्षण करता येत नाही; कारण गणांना स्वतःच्या मर्यादा असतात.
४. पितरलोकातील लिंगदेहांच्या रक्षणासाठी असलेल्या दत्ताच्या गणांच्या निर्मितीची प्रक्रिया
सृष्टीच्या प्रारंभीच्या काळात जे प्रारंभीचे पितर होते त्यांपैकी काही पितर दत्तभक्त होते. त्यांची सूक्ष्म लोकांत राहून दत्ताची सेवा करायची इच्छा होती. त्यामुळे भगवान दत्तगुरूंनी त्या पितरांना स्वतःचे ‘गण’ म्हणून स्थान दिले आणि त्यांना पितरलोकांच्या रक्षणाचे दायित्व दिले.
शिवाचे गण असतात, त्याप्रमाणे दत्ताचे गण असतात. दत्ताच्या गणांमध्ये लिंगदेहांच्या रक्षणाचे आध्यात्मिक सामर्थ्य असते, तसेच त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा असल्याने ते सूक्ष्म लोकात वैशिष्ट्यपूर्ण कार्य प्रभावीपणे करत असतात.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |