५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू येथील चि. वेदांत श्रवण कलबुर्गी (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. वेदांत श्रवण कलबुर्गी हा या पिढीतील एक आहे !
आज २४.९.२०२४ (भाद्रपद कृष्ण सप्तमी) या दिवशी बेंगळुरू येथील चि. वेदांत श्रवण कलबुर्गी याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. वेदांत श्रवण कलबुर्गी याला तिसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. व्यवस्थितपणा
‘चि. वेदांतला स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने रहाणे आवडते.
२. उत्तम ग्रहणशक्ती
कोणताही विषय समजावून सांगितल्यावर त्याला त्याचे चांगल्या प्रकारे आकलन होते.
३. धर्माचरण
तो प्रतिदिन गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राला नमस्कार करतो. एखाद्या वेळी मी विभूती लावायला विसरलो, तर तो मला आठवण करून देतो. त्याला कपाळावर कुंकू किंवा विभूती लावणे पुष्कळ आवडते.
४. नामजप आणि भक्तीगीते ऐकायला आवडणे
वेदांतचा जन्म झाल्यापासून त्याला प्रत्येक दिवशी नामजप किंवा भक्तीगीते ऐकायला आवडतात. आम्ही प्रवासात असतांना भ्रमणभाषवर नामजप लावतो. तेव्हा तो एकाग्रतेने नामजप ऐकतो. त्याला श्रीकृष्ण, श्रीराम आणि देवी यांची भक्तीगीतेही पुष्कळ आवडतात. तो झोपतांना जप किंवा भक्तीगीते लावायला सांगतो.
५. सात्त्विकतेची ओढ
आम्ही वेदांतला घेऊन समाजातील एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर तेथील रज-तम वातावरणामुळे त्याची चिडचिड होते. आम्ही त्याला मंदिरासारख्या सात्त्विक ठिकाणी घेऊन गेलो, तर ते त्याला आवडते. तो देवाला अत्यंत भावपूर्ण नमस्कार करतो.
६. संतांकडे आकर्षित होणे
एकदा आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. आश्रमाच्या प्रवेशदाराजवळ वेदांत माझ्या बहिणीच्या समवेत चालत होता. तेव्हा त्याला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसल्या. त्याने माझ्या बहिणीचा हात सोडला आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा हात धरून चालू लागला अन् त्यांच्याशी बोलू लागला. सहसा तो कुटुंबातील सदस्यांना सोडून इतरांकडे जात नाही.
– श्री. श्रवण कलबुर्गी (चि. वेदांतचे वडील), बेंगळुरू, कर्नाटक. (२८.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |