Tirupati Laddu Row : तिरुपती मंदिराच्‍या लाडूंच्‍या प्रकरणी डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांची सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

चौकशीसाठी समिती स्‍थापन करण्‍याची केली मागणी !

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी

नवी देहली – तिरुपति बालाजी मंदिराच्‍या प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये प्राण्‍यांच्‍या चरबीचा वापर झाल्‍याच्‍या प्रकरणी भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली आहे. मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्‍या आरोपांची चौकशी करण्‍यासाठी डॉ. स्‍वामी यांनी उच्‍चस्‍तरीय आणि स्‍वतंत्र संस्‍था नियुक्‍ती करण्‍याची विनंती केली आहे.

या याचिकेत डॉ. स्‍वामी यांनी म्‍हटले आहे की, तिरुपतीचा भोग प्रसाद म्‍हणून दिल्‍या जाणार्‍या लाडूंमध्‍ये निकृष्‍ट घटक आणि प्राण्‍यांची चरबी असल्‍याच्‍या आरोपांची चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या देखरेखीखाली एक समिती स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात यावेत. त्‍याचबरोबर प्रयोगशाळेमधील लाडूंच्‍या चाचणीचा अहवाल आणि त्‍या चाचणीत वापरण्‍यात आलेल्‍या तुपाच्‍या नमुन्‍याच्‍या स्रोताविषयाचा अहवाल बनवण्‍याचा आदेश न्‍यायालयाने द्यावा, अशी मागणी करण्‍यात आली आहे .

डॉ. स्‍वामी यांचे अधिवक्‍ता राजीव कुमार आणि सत्‍यम सिंह यांनी सांगितले की, या याचिकेतही कोट्यवधी भाविकांच्‍या श्रद्धेला धक्‍का पोचलेल्‍या या प्रकरणाची चौकशी करण्‍याचे आदेश देण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे.