Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूंच्या भेसळीमुळे तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण

महाशांती होम आणि पंचगव्याचे प्रोक्षण (शिंपडणे)

शुद्धीकरण करताना पुजारी

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुपती बालाजी मंदिरात प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचा प्रसादाच्या लाडूंसाठी वापर करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आता मंदिराची शुद्धी करण्यात आली आहे. २३ सप्टेंबरला सकाळी येथे शांती होम करण्यात आला, तसेच पंचगव्याचे प्रोक्षण करण्यात आले.

तिरुपती तिरुमला मंदिर समितीच्या वतीने सकाळी ६ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत महाशांती होम आणि पंचगव्य प्रोक्षण करण्यात आले. दुपारपर्यंत आणखी काही धार्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती सहभागी झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लाडूतील भेसळीच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण समितीची स्थापना

प्रसादाच्या लाडूंतील भेसळाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण समिती स्थाप करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेत ही समिती काम करणार आहे. या प्रकरणात सत्तेचा दुरुपयोग कुणी केला ?, हे देखील तपासले जाणार आहे. या समितीचा अहवाल सरकारकडे सोपवला जाईल. ‘हा अहवाल आल्यानंतर आम्ही कठोर पावले उचलू’ असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. ‘तिरुमला तिरुपती हे पवित्र देवस्थान आहे. देवाच्या प्रसादात पुन्हा भेसळ करण्याचे धाडस कुणाचे होणार नाही, अशा प्रकारे आम्ही दोषींना शिक्षा करू’, असेही नायडू यांनी म्हटले आहे.