थोडक्यात महत्त्वाचे : २० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !….मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !
२० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !
मुंबई – चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेला आरोपी धर्मांध आयुब शेख याला २० वर्षांनंतर गुन्हे शाखेने अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे नोंद आहेत. मुलुंड पोलिसांनी वर्ष २००४ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात शेखला अटक केली होती; मात्र जामिनावर सोडल्यापासून तो न्यायालयात उपस्थित रहात नव्हता. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले. अनेक वर्षांपासून तो नावे पालटून ठाणे आणि नवी मुंबई येथे रहात होता.
संपादकीय भूमिका : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे उदाहरण !
मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !
डोंबिवली – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील स्वप्नील अनिल धुमाळ (वय २३ वर्षे) येथे त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता; परंतु मैत्रिणीने त्याला भेटण्यास नकार दिला. या नैराश्यातून त्याने मैत्रिणीच्याच इमारतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारून आत्महत्या केली. (तरुणांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – संपादक)
११ वर्षीय मुलाची आत्महत्या !
कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील ११ वर्षांच्या मुलाने आई-वडील घरात नसतांना टिटवाळा येथील अल्पवयीन मुलीला घरी आणले होते. (भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी पाहून मुले चुकीच्या कृती करतात. यासाठी पालकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे ! – संपादक) आई-वडील अचानक घरी आल्यावर त्यांनी मुलाला प्रश्न विचारले. त्यानंतर ते मुलीला सोडण्यास तिच्या घरी गेले. ‘आई-वडील ओरडतील’, या भीतीपोटी मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
संपादकीय भूमिका : ११ वर्षाच्या मुलाला आत्महत्या करणे शक्य व्हावे, अशी समाजाची झालेली स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण अपरिहार्य !
रासायनिक स्फोटात ५ कामगार घायाळ !
बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन् ९० वरील ‘कॅलीक्स केमिकल’ या रासायनिक कारखान्यामध्ये उत्पादन प्रक्रिया चालू असतांना ‘ड्रायर’चे तापमान अचानक वाढले आणि त्याचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरिरावर पडून ५ कामगार गंभीररित्या भाजले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
एन्.के. टोळीच्या प्रमुखासह साथीदारांवर ‘मकोका’ कारवाई !
पुणे – येरवड्यातील एन्.के. टोळीचा प्रमुख निखिल कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. २४ ऑगस्टला टोळीने येरवडा भागातील तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी चोरली होती. कांबळेसह त्याच्या साथीदारांनी पुणे परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.