मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास होणार !

मुंबई – दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा या परिसराचा समूह पुनर्विकास महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्याकडून केला जाणार आहे. येथील अपुर्‍या जागेमुळे या परिसराचा समूह विकासच करावा लागणार आहे.

म्हाडाकडून हा पुनर्विकास काढून घेण्याविषयीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्र्यांच्या संमतीसाठी पाठवल्याचे कळते. तसे झाल्यास महापालिकेकडून कामाठीपुराचा पुनर्विकास केला जाण्याची शक्यता आहे. या परिसराचा पुनर्विकास महापालिकेकडून राबवून घेण्याचा एका विकासकाचा आग्रह असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसराच्या विकासाची घोषणा केली होती.

या प्रकल्पाच्या दृष्टीने म्हाडाने प्राथमिक गोष्टी करून ठेवल्या आहेत. प्रत्येक रहिवाशाला ५०० चौरस फुटांचे घर मिळणार असून म्हाडाला १ सहस्रांहून अधिक घरे विक्रीसाठी मिळणार आहेत.

२७ एकरवर पसरलेल्या या परिसरात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती, तसेच पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारती आहेत. ५२ इमारती कोसळल्या असून १५ धार्मिकस्थळे, २ शाळा, ४ सरकारी कार्यालये आणि ८ इतर बांधकामे आहेत.

म्हाडाने मेहनत घेऊन कामाठीपुरा प्रकल्प उभा केला आहे. म्हाडाने आता निविदा काढण्याची प्रक्रिया चालू करावी. नियोजन प्राधिकरण कोणीही असले तरी प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे आहे, असे नगरविकास प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !