१.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !
मुंबई सीमाशुल्क विभागाची तस्करी करणार्यांवर कारवाई
मुंबई – मुंबई सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण १.५८ कोटी रुपयांची तस्करी होणारे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त केले आहेत. यात ३ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. (अशा प्रकारे प्रतिदिन तस्करी करणार्यांना अटक केल्याची वृत्ते येतात; पण त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, हेही उघड व्हायला हवे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल ! – संपादक)
१. पहिल्या प्रकरणात दुबईहून मुंबईत येणार्या संशयित प्रवाशाला थांबवण्यात आले. त्याने सोने त्याच्या पँटच्या बेल्टजवळ लपवले होते. सहप्रवाशाने तसे करण्यास सुचवल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
२. दुसर्या प्रकरणात हाँगकाँगहून मुंबईकडे येणार्या एका प्रवाशाला थांबवण्यात आले. त्याने सोने आणि रोलेक्स घड्याळ परिधान केले होते, तर हिरे त्यांच्या बनियनच्या आत विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. या प्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली.