महापे (नवी मुंबई) येथे बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक

  • ७७ सहस्र रुपयांची खरी रक्कम, तर ८१ सहस्र रुपयांच्या खोट्या नोटा आढळल्या

  • १३ भ्रमणभाष संच, स्कॅनर, प्रिंटर आणि भ्रमणभाष जप्त

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – फायनान्सियल इंटेलिजन्स युनिटने महापे (नवी मुंबई) येथे एका वसतीगृहात (लॉजमध्ये) बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक केली आहे. विवेक कुमार प्रेमबाबू पिपळे (वय ३५ वर्षे) आणि अश्विनी विश्वनाथ सरोदे (वय ३६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही गेल्या ४ महिन्यांपासून कृष्णा पॅलेस लॉजमध्ये रहात होते. ते नेहमी जेवण ऑनलाईन मागवायचे. अधिकार्‍यांना धाड टाकल्यावर तेथून १३ भ्रमणभाष संच, स्कॅनर, प्रिंटर आणि भ्रमणभाष जप्त करण्यात आला आहे. दोघांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिकार्‍यांना ७७ सहस्र रुपयांची खरी रक्कम आणि ८१ सहस्र रुपयांच्या खोट्या नोटा आढळल्या आहेत. नोकरीधंदा नसतांनाही ते ऐषोआरामात रहात होते. त्यांनी आतापर्यंत किती रुपयांच्या नोटा छापल्या आहेत, याचा शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका :

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! या दोघांसमवेत आणखी कुणाचा सहभाग आहे ? याचीही चौकशी पोलिसांनी करावी !