दारु आणि अहिंसा !
आचार्य अत्रे यांनी जानेवारी १९४८ मध्ये लिहिलेला ‘दारु आणि अहिंसा’ यांविषयी लिहिलेला हा लेख आजही तितकाच मार्गदर्शक आणि चिंतनीय आहे.
छे, छे, छे, अहिंसाबाज माणूस सत्याची जेवढी हिंसा करतो, तेवढी हिंसावादी माणसाच्या हातूनही कधी हिंसा घडत नसेल, म्हणून अहिंसाबाजावर जो विश्वासला त्याचा सर्वनाश झाल्यावाचून रहाणार नाही.
– आचार्य प्रल्हाद केशव अत्रे |
१. अहिंसेच्याही ३ अवस्था
‘अहिंसेच्या प्रभावाने घाबरून इंग्रज हा देश सोडून चाललेले आहेत’, या अहिंसाबाजांच्या वल्गना दारूबाजांच्या बरळण्याप्रमाणेच हास्यास्पद आहेत.
दारूच्या जशा तीन अवस्था असतात, तशा अहिंसेच्याही ३ अवस्था असतात. देशांतील बहुतेक सर्व वृत्तपत्रकार हे आज अहिंसेच्या पहिल्या अवस्थेत आहेत. काँग्रेसच्या मागे जाणारी देशातील कोट्यवधी जनता ही अहिंसेच्या दुसर्या अवस्थेमध्ये आहे आणि काँग्रेसचे उजवे अन् डावे (साम्यवादी) पुढारी हे अहिंसेच्या तिसर्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत. गांधीजींची तर तिसरी अवस्था कधीच संपून गेली आहे. ते सध्या भयंकर अवस्थेत आहेत.
पहिल्या अवस्थेतील अहिंसाबाज लवकर ताळ्यावर येऊ शकतील आणि ते ताळ्यावर आले, म्हणजे अहिंसेच्या दुसर्या अवस्थेत गेलेल्या जनतेला ते ताळ्यावर आणू शकतील. तिसर्या अवस्थेत नुकत्याच शिरलेल्या काँग्रेसच्या डाव्या पुढार्यांना दुरुस्त होण्याची थोडीतरी काही आशा आहे; पण अहिंसेच्या तिसर्या अवस्थेत जाऊन पोचलेले काँग्रेसचे पुढारी शुद्धीवर येण्याची मात्र आता मुळीच आशा उरलेली नाहीं. म्हणून त्यांचा नाद आपण अजिबात सोडून दिला पाहिजे. संयमाच्या सर्व मर्यादा ओलांडून अतिरेकाच्या अत्यंत निकराच्या शेवटच्या टप्प्याला गांधीजी जाऊन बसलेले आहेत.
२. गांधीजी हे अहिंसाबाजीच्या शेवटच्या अवस्थेत गेलेले असणे
‘गुंडांनी जर तुमच्या अब्रूवर आक्रमण केले, तर तुम्ही विष खाऊन जीव द्या’, असे पूर्व बंगालच्या स्त्रियांना बजावणारे गांधीजी, हे अहिंसाबाजीच्या शेवटच्या अवस्थेत गेलेले नव्हेत काय ? ‘अहमदाबादचा (कर्णावतीचा) जातीय दंगा मी कसा थांबवू ?’, असे विचारणार्या मोरारजीभाईंना ‘तुम्ही दंग्याच्या भागांत एकटे जाऊन मरा !’, असे सांगणारे गांधीजीं हे अहिंसाबाजीच्या अंतिम टोकाला जाऊन पोचलेले नव्हते काय ? ‘रघुपति राघव राम रहीम । पतित पावन कृष्ण करीम’, ही प्राणावर उदार झालेल्या अहिंसाबाजाची शेवटची केविलवाणी धडपड नव्हे, तर काय आहे ?
३. गांधीजींनी अहिंसेसाठी घेतलेला आत्मघातकी ध्यास
‘हिंदुस्थानने आपल्या संरक्षणासाठी सैन्य ठेवता कामा नये आणि ठेवले, तर त्याने मुसलमानांविरुद्ध शस्त्र न उपसण्याची शपथ घेतली पाहिजे’, असे आत्मघातकी अहिंसाबाजीचे प्याल्यावर प्याले झोकून ‘कर्तृत्वासकट काँग्रेसला, हिंदुसकट हिंदुस्थानला आणि अब्रूसकट अखंडत्वाला’ मूठमाती देण्याची भाषा गांधीजी आता बोलू लागलेले आहेत. आता पृथ्वीवर प्रत्यक्ष राम आणि रहीम जरी उतरले, तरी इरेला चढलेले आमचे गांधींजी आपला अहिंसेचा हट्ट सोडणार नाहीत. ‘देशाची फाळणी झाली, तरी हरकत नाही; लक्षावधी लोक प्राणाला मुकले, तरी फिकीर नाही आणि उरलेला सर्व हिंदुस्थान पाकिस्तानच्या घशात गेला, तरी पर्वा नाही; पण माझी अहिंसा खरी ठरली पाहिजे’, हा एकच ध्यास गांधीजींनी घेतलेला आहे.
‘मी स्वतः चुकलो आहे. ३० वर्षे काँग्रेस चुकलेली आहे. जनतेने मोठमोठ्या चुका केल्या आहेत’, अशी दोषांची खापरे जगाच्या डोक्यावर गांधीजी फोडत बसतील; पण ‘माझी अहिंसा चुकीची आहे’, असे शब्द मात्र प्राण गेला, तरी त्यांच्या तोंडून कधीही निघणार नाहीत.
४. दारुबाज आणि अहिंसाबाज यांच्यातील मोठा भेद
दारुबाज आणि अहिंसाबाज यांच्यात एवढे साम्य असूनही या दोन्ही व्यसनांत एक मोठा भेद आहे. दारु पिणारा मनुष्य हा खोटे कधीही बोलत नाही. जगात दारूबाजाएवढा सत्याचा पुरस्कर्ता कुणीही नसेल; पण अहिंसाबाज माणूस हा सत्य कधीही बोलत नाही; कारण डोक्यांत आणि डोळ्यांत अहिंसेचा कैफ (नशा) चढल्यानंतर त्याला सत्य दिसूच शकत नाही. त्यामुळे अहिंसाबाज माणूस नेहमी असत्य बोलतो; पण ‘आपण जे बोलतो ते सत्य असते’, असे मात्र तो दिमाखाने जगाला सांगत सुटतो.
५. अहिंसाबाजाच्या बोलण्यातील विसंगती आणि खोटेपणा उघड करणारी उदाहरणे
अ. ‘मुस्लीम लीगच्या दाराशी मी फिरून कधीही जाणार नाही’, असे अहिंसाबाज माणूस छातीवर हात मारून बोलतो आणि दुसर्याच क्षणी तो जिनांच्या घराचा जिना चढू लागतो. १६ मे या दिवशीची योजना ही ‘अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची योजना आहे’, असे अहिंसाबाज माणूस आधी आग्रहाने बोलतो आणि ‘मागाहून तीच योजना पाकिस्तानची योजना होती’, असे तो आपणास बजावून सांगतो.
आ. ‘देशाचे तुकडे होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील’, अशी वीरगर्जना करणारा अहिंसाबाज माणूस शेवटी देशाच्या फाळणीला मान्यता देऊन मोकळा होतो. उभ्या हयातीत तलवार कशी असते, हे डोळ्यानेही ज्याने पाहिले नाही, असा अहिंसाबाज ‘तलवारीला तलवार भिडेल’, अशा वीरश्रीच्या आरोळ्या बेदिक्कत ठोकू लागतो.
इ. मुसलमानांच्या अत्याचाराला भिऊन फाळणीला संमती देणारा भेकड अहिंसाबाज ‘काँग्रेसचा महान विजय झाला आणि जीनांचा भयंकर पराभव झाला’, असे जाहीरपणे सांगावयाला मागे-पुढे पहात नाही.
ई. ‘१५ ऑगस्टनंतर आम्ही अलौकिक पराक्रम दाखवणार आहोत’, असे मिशीला पीळ भरून सांगणारा अहिंसाबाज शेवटी गोर्यासाहेबालाच हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल नेमण्याची शिफारस करतो.
६. अहिंसेने कल्याण झाल्याचा एकतरी पुरावा आहे का ?
वेश्या आणि जुगार हे दारूबाजाचे जसे २ मित्र असतात, त्याप्रमाणे ‘असत्य अन् भ्याडपणा’ हे अहिंसाबाजाचे २ घनिष्ठ मित्र असतात. ‘अहिंसेनेच अखेर मानवतेचे कल्याण होणार’, असे अहिंसाबाज सांगतात हे खरे; पण त्याचा प्रत्यक्ष पुरावा अद्याप तरी त्या पृथ्वीतलावर काही पहावयाला सापडलेला नाही.
अहिंसाबाजीपासून जो जो समाज आणि जे जे राष्ट्र दूर राहिले आहे, त्यांचे नेहमी कल्याणच झालेले आहे. अहिंसेचा नाद जनाब जीनांना लागला असता, तर ७ वर्षांत कसलाही पराक्रम न करता स्वतंत्र पाकिस्तान फुकट त्यांच्या पदरात पडले असते होय ?
७. दारूबंदीच्या आधी अहिंसाबाजीची बंदी व्हायला हवी !
म्हणून अहिंसाबाजीच्या तिसर्या अवस्थेत शिरलेल्या काँग्रेस पुढार्यांचा नाद सोडून अहिंसेच्या मोहापासून धैर्याने आणि निश्चयाने जनता जर परावृत्त झाली, तरच तिची आता धडगत आहे.
मग सांगा, ‘देशात दारूबंदी होण्याच्या आधी कायद्याने अहिंसाबाजीची बंदी व्हावयाला पाहिजे’, असे तुम्हाला वाटत नाही काय ?
– आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (जानेवारी १९४८)