संपादकीय : अतीकामाचे मृत्यू !
पुण्यातील ‘अर्न्स्ट अँड यंग इंडिया (Ernst & Young India)’ या बहुराष्ट्रीय आस्थापनात काम करणार्या सनदी लेखापाल (सीए) ॲना सेबास्टियन या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे बहुराष्ट्रीय आस्थापनांतील कामाच्या ताणाचे सूत्र पुन्हा उपस्थित झाले आहे. ॲना यांच्या मृत्यूची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून नोंद घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. ॲना यांच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी दिवसा आणि रात्रीही पुष्कळ काम करायची. तिला विचारल्यावर ‘आस्थापनाकडून पुष्कळ काम दिले जाते’, असे तिने सांगितले. याविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खेद व्यक्त केला. ‘याविषयी काहीतरी ठरवले पाहिजे’, असे त्यांचे म्हणणे आहे. आस्थापनाने स्वत:चे हात झटकतांना ‘आम्ही कर्मचार्यांचा विचार करतो. या प्रकरणी आम्ही कुटुंबाला अधिकाधिक सहकार्य करू’, असे सांगितले आहे. आस्थापन असे सांगत असले, तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या अंत्यविधीला आस्थापनातील कुणीही, म्हणजे तिचे सहकारीही उपस्थित नव्हते. ॲना यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि मार्चमध्ये या आस्थापनामध्ये ती रुजू झाली अन् जुलैमध्ये तिचा मृत्यू झाला. केवळ ५ मासांमध्ये तिचा मृत्यू झाला.
आकर्षक ‘पॅकेज’ अन् प्रचंड स्पर्धा !
ॲना ज्या आस्थापनात काम करत होती, ते ‘कॉर्पाेरेट’ जगतातील नामांकित आस्थापन आहे. ‘तिला आस्थापनात असतांना विश्रांती मिळत नव्हती आणि जेवण नीट घेता येत नव्हते’, असे तिच्या वडिलांनी सांगितले. परिणामी तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. सध्या कॉर्पाेरेट क्षेत्राचा विचार करता, तेथे प्रचंड स्पर्धा चालू आहे. आस्थापनाशी संबंधित क्षेत्रातील शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेल्या तरुण-तरुणींना नोकरी मिळवण्यासाठी पुष्कळ स्पर्धा करावी लागते; कारण या बहुराष्ट्रीय आस्थापनांत चांगल्या ‘पॅकेज’ची नोकरी मिळवण्याचे खूळ मनात गेलेले असते. त्यामुळे ते मनाची सिद्धता करूनच रात्रंदिवस अभ्यास करतात. अधिकाधिक चांगले पॅकेज मिळवण्यासाठी प्रयत्न करतात; मात्र बहुराष्ट्रीय आस्थापन हे काही सरकारी कार्यालयासारखे नसते. तिथे तुम्ही अभ्यास करतांना, परीक्षा उत्तीर्ण होतांना घेतलेल्या कष्टांहून अधिक कष्ट दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागतात. स्वत:च्या अधिकोष खात्यात वेतनाच्या जमा होणार्या मोठ्या रकमा दिसत असल्या, तरी त्यासाठी पुष्कळ कष्ट सोसावे लागलेले असतात. तरुण-तरुणी अधिकोषात जमा होत असलेल्या रकमेच्या भरवशावर पुढील आयुष्यासाठी सदनिका, गाड्या, उंची वस्तू घेण्यासाठी बेत आखत असतात. याच मानसिकतेचा बहुराष्ट्रीय आस्थापने लाभ घेतात आणि त्यांना कामाची गुणवत्ता अन् कामातील गती यांनुसार विविध आर्थिक लाभ त्यांच्या वेतनात समाविष्ट करून देतात. बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये अधिक कामाचे वेगळे पैसे देतातच, असे नाही, तरी ते कर्मचार्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. कोरोना महामारीच्या काळात अनेक आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (घरून काम करण्याची) सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसे पाहिले, तर ती चांगली सुविधा वाटते; कारण घरी राहून काम करायचे; मात्र याविषयी काहींचा अनुभव चांगला नाही. घरून काम करायचे, म्हणजे सकाळी लवकर प्रारंभ करायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचे. यामध्ये आस्थापनाची अट असते ती, म्हणजे कर्मचार्याने या संपूर्ण वेळेत ऑनलाईन असले पाहिजे, तरच तो पूर्ण दिवस धरून त्याला पैसे मिळू शकतात, म्हणजे त्याने घरून काम तर करायचे; मात्र घरातील कामे करायची नाहीत अथवा विश्रांती घ्यायची नाही. यापेक्षा आस्थापनात जाऊन काम करणे परवडले, असेही अनेकांना वाटते.
कामाच्या शिस्तीविषयी बोलायचे, तर मध्यंतरी प्रशासनाने एक नियम काढला होता, ‘तरुणी-महिला या कामाचे घंटे पूर्ण करून घरी गेल्यावर कार्यालयातून त्यांना वरिष्ठांनी पुन्हा कामासाठी संपर्क करू नये, जेणेकरून तरुणी-महिला यांना त्यांचे खासगी आयुष्य नीट जगता येऊ शकेल.’ या नियमालाही अनेकदा धाब्यावर बसवल्याचे लक्षात येते आणि आस्थापनातून कामासाठी रात्रीही संपर्क करण्यात येतात. परिणामी एक प्रकारची त्रस्तता न आल्यास नवल ते काय ! बहुराष्ट्रीय आस्थापनाच्या एकूणच कार्यपद्धती आणि कामाचा ताण यांविषयी ॲना यांच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू झाली आहे. अनेक जण याविषयी व्यक्त होत आहेत, ‘याविषयी काही मार्गदर्शक सूचना असाव्यात, अन्यथा बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून कर्मचार्यांची छळवणूक होत राहील.’
कार्यसंस्कृती आणि वातावरण
इंग्रजीत ज्याला आपण ‘वर्क कल्चर’ (कार्यसंस्कृती) म्हणतो, ते प्रत्येक आस्थापन स्वत:च्या माहितीपुस्तिकेत नमूद करते. ‘आमच्या येथे चांगली कार्यसंस्कृती आणि कामाचे वातावरण चांगले असते’, असे सांगितले जाते. काही आस्थापनांमध्ये असे असतेही, यात वाद नाही. मोठी बहुराष्ट्रीय आस्थापने कामाच्या ठिकाणी कर्मचार्यांसाठी चांगल्या दर्जाचे जेवण, अल्पाहार, घरून ये-जा करण्यासाठी बस, चारचाकी यांची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देतातच. त्यांचा उद्देश मात्र कर्मचार्याची काळजी हा असतो. ‘कर्मचार्याने सदैव कामासाठी दक्ष असले पाहिजे, सदैव आस्थापनाच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे, आस्थापनाचा लाभ वाढवला पाहिजे, आपले आस्थापन कोणत्याही परिस्थितीत पुढे गेले पाहिजे’, अशा स्वरूपाचे उद्देश असतात. परिणामी याचा सूक्ष्म ताण कर्मचार्यांच्या मनावर असतोच. बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये कामाची शिस्त आणि ठरवून दिलेले काम मग ते कितीही असो, समयमर्यादेतच कर्मचार्याने पूर्ण करून देण्याचे अलिखित बंधन असतेच ! यात कर्मचार्याच्या काही कारणाने उद्भवलेल्या घरातील वा त्याच्या स्वत:च्या शारीरिक समस्या यांचा विचार अभावानेच असतो. काही जणांना कामाचा ताण झेपतो, ते तसेच आयुष्य पुढे रेटतात; मात्र काही काळाने त्यांना विविध आजारांनी कवटाळलेले असते. भरपूर पैसे मिळवण्याच्या नादात शरीर आणि मन यांवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे ते निवांत होण्यासाठी सुटी घेऊन फिरायला गेले, तरी आल्यावर पुन्हा ताण निर्माण होणारच असतो. ॲना यांच्या पालकांचे म्हणणे आहे की, त्यांची मुलगी कामाच्या ताणामुळे मृत्यूमुखी पडली, तशी वेळ आस्थापनाच्या अन्य कर्मचार्यांवर येऊ नये. ॲना यांच्या पालकांची मागणी रास्त आहे; मात्र ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती कुणाकडे आहे ? या आस्थापनाकडे तर ती नाहीच नाही. केंद्रीय स्तरावरून या घटनेची नोंद घेतली गेली, ते योग्यच झाले. केंद्राकडूनच याविषयीच्या मार्गदर्शक सूचना सिद्ध करून त्या अशा बहुराष्ट्रीय आस्थापनांना लागू केल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांच्याकडून अधिक लाभ कमावण्याच्या नादात कर्मचार्यांची होणारी पिळवणूक थांबू शकेल !
बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून अधिक लाभ कमावण्याच्या दृष्टीने होत असलेली कर्मचार्यांची पिळवणूक रोखण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप हवा ! |