तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये गोमांसाची चरबी घालणार्यांना कठोर शिक्षा करा !
आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये गोमांसाची चरबी, डुकराची चरबी आणि ‘फिश ऑईल’चा (माशाच्या तेलाचा) वापर केल्याचा आरोप झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणी आंध्रप्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि ‘वाय्.एस्.आर्. काँग्रेस’चे नेते वाय्.एस्. जगन मोहन रेड्डी यांनाच उत्तरदायी धरले. त्यानंतर लगेचच ‘टीडीपी’ने (तेलगू देसम् पक्षाने) लाडूसाठी वापरल्या जाणार्या तुपात गोमांस चरबी आणि ‘फिश ऑईल’ (माशांचे तेल) मिसळल्याचा अहवाल उघड केला. ‘नायडू यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत’, असे मानले जात होते; परंतु सरकारनेच त्यासंबंधीची कागदपत्रे अधिकृतपणे उघड केली आहेत. ही कागदपत्रे पाहून प्रत्येक हिंदूचे रक्त सळसळते, तसेच यामुळे हिंदु भाविक आणि बालाजी भक्त यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
तिरुमला तिरुपती मंदिर ट्रस्ट हे जगातील सर्वांत श्रीमंत हिंदु मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातून मिळणारा लाडवाचा प्रसाद पुष्कळ प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक या देवतेचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. आयटी मंत्री नारा लोकेश यांनी आंध्रप्रदेशच्या ‘वाय्.एस्.आर्. काँग्रेस’ सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘तिरुमला येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आमचे सर्वांत पवित्र मंदिर आहे. वाय.एस्. जगन मोहन रेड्डी प्रशासनाने तिरुपती प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली आहे, हे जाणून मला धक्का बसला आहे.’’
१. जगन मोहन रेड्डी यांनी भक्तांना गोमांस खायला देऊन पाप का केले ?
बालाजीचा ‘व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा’, असा जयजयकार सर्वत्र प्रचलित आहे. त्यात गोविंदा म्हणजे गायींचा रक्षण करणारा; पण आज गोविंदाच्या भक्तांना गायीचे मांस खाऊ घालून ‘तत्कालीन माजी मुख्यमंत्री जगन मोहन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एवढे मोठे पाप का केले ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘गायीमध्ये ३३ कोटी देव आहेत’, असे मानणार्या हिंदूंची याद्वारे मोठी फसवणूक केली आहे, असे म्हणता येईल.
२. अहिंदूंना लाडू बनवण्याचे कंत्राट का दिले गेले ?
तिरुपतीच्या परिसरामध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. तिरुपतीचे लाडू बनवण्याचे कंत्राट अहिंदूंना दिले गेले होते, असेही आता समोर येत आहे. मुळातच अहिंदूंना लाडू बनवण्याचे कंत्राट का दिले गेले ? हिंदूंच्या मंदिरासाठी लाडू बनवण्याचे कंत्राट हिंदु भक्ताला का देण्यात आले नाही ? यामागे काही षड्यंत्र होते का ? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंदिर सरकारीकरणाचा हाही एक दुष्परिणाम या निमित्ताने समोर आला आहे.
३. काय आहे त्या अहवालात ?
पशूखाद्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करणार्या ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’च्या फूड लॅब, काल्फ (CALF)’ या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात असे दिसून आले आहे की, तिरुपतीचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या तुपाच्या नमुन्यांमध्ये पाम तेल, ‘फिश ऑईल’, ‘बीफ टॅलो’ (टीप) यांसह अनेक फॅट्स आहेत. या अहवालाची प्रत सत्ताधारी तेलगू देसम् पक्षाचे प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी यांनी प्रसारित केली आहे. तिरुपती तिरुमला मंदिराला कंत्राटदाराने पुरवलेल्या तुपात केवळ १९ टक्के तूप असल्याचे आढळून आले.
(टीप : ‘बीफ टॅलो’ गोमांसाच्या चरबीपासून बनवले जाते. त्यामध्ये रंप रोस्ट, रिब्स आणि स्टीक यांसारख्या गोमांसाच्या तुकड्यांमधून निघालेली चरबी असते. हे मांसापासून काढलेली शुद्ध चरबी वितळवूनही बनवता येते, जे थंड झाल्यावर लवचिक पदार्थात रूपांतरित होते.)
४. या प्रकरणाला माजी पुजार्यांनी दिला दुजोरा !
तिरुमला मंदिराचे माजी पुजारी ए.व्ही. रमण दीक्षितुलु यांनी या प्रकरणावर म्हटले आहे, ‘‘प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे गायीचे तूप, हे पुष्कळ अशुद्ध आणि निकृष्ट दर्जाचे होते. हे मला अनेक वर्षांपूर्वी लक्षात आले आणि याविषयी मी संबंधित अधिकारी अन् विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यांच्या समोर मांडले; पण त्यांना याची पर्वा नव्हती. मी या प्रकरणात एकटा होतो; पण आता नवीन सरकारने (चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने) सत्ता हाती घेतली आहे आणि सर्व घाण साफ करण्याचे आश्वासन दिले आहे. कोट्यवधी भाविकांची अगाध श्रद्धा असलेल्या या पवित्र मंदिरात अशा गंभीर पापांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.’’
५. चौकशी व्हायलाच हवी !
वर्ष २०१९ पूर्वी लाडू बनवण्यासाठी कर्नाटक येथील प्रसिद्ध सरकारी आस्थापन ‘कर्नाटक सहकारी दूध महासंघा’कडून शुद्ध तूप खरेदी केले जात होते; मात्र जगन सरकारने हे तूप थांबवले आणि अन्य आस्थापनाला तूप खरेदीचे कंत्राट दिले. तत्कालीन सरकारने याद्वारे हिंदूंना गोमांस खाऊ घालायचा डाव होता का ? किंवा अन्य काही षड्यंत्र वा आर्थिक घोटाळा करण्याचा डाव होता का ? हे सर्व चौकशीत समोर येऊ शकते.
६. मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामात आणखी एका प्रकरणाची भर
आज केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. भक्तांनी दिलेल्या अर्पणात (धन, वस्तू, भूमी) आज भ्रष्टाचार होत आहे. प्राचीन काळी राजे-महाराजे देवतांच्या नावे भूमी द्यायचे, मंदिर बांधायचे आणि स्वतः त्याचे भक्त वा सेवक म्हणून काळजी घ्यायचे; पण आज लोकशाहीतील राजकारणी मंदिरात कोणकोणत्या प्रकाराने भ्रष्टाचार करू शकतो ? हे कल्पनातीत आहे आणि हे तिरुपती मंदिराच्या या प्रकरणातून प्रकर्षाने दिसून येते. प्रसादाच्या लाडवासाठी वापरल्या जाणार्या तुपात गोमांस चरबी वापरली जाणे, हे मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामात आणखी एका प्रकरणाची भर घालण्यासारखे आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचे मोल न करता आज मंदिरांना सरकारकडून आस्थापनाप्रमाणे चालवण्यात येते; मात्र चर्च आणि मशिदी कधीच सरकारच्या अखत्यारीत घेतल्या जात नाहीत. निधर्मी सरकारकडून असा भेदभाव का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. केवळ याच प्रकरणातील नव्हे, तर मंदिर सरकारीकरणात भ्रष्टाचार करणार्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांना कठोरातील कठोर शासन भगवान बालाजी देईलच; पण प्रशासनानेही कठोर शासन करायला हवे !
– श्री. प्रशांत हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२४)
भूतलावरील वैकुंठ असलेले अद्वितीय तिरुपती बालाजी मंदिर !
‘तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर हे आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. ते हिंदूंचे भारतातील सर्वांत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराविषयीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पुढील लिखाणातून जाणून घेऊया.
१. श्रद्धेय असणार्या तिरुपती बालाजी मंदिरात विविध प्रसंगी होणारी भाविकांची गर्दी !
तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक येतात. सण-उत्सवाला तेथे भाविकांच्या रांगा लागतात. विशेषत: कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते.
कोरोना महामारीच्या दृष्टीने देशभरात दळणवळणबंदी घोषित झाल्यानंतर तिरुपती बालाजीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता महामारीचे संकट नसल्यामुळे मंदिरात पुन्हा मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
२. श्री तिरुपती बालाजीच्या मूर्तीची वैशिष्ट्ये
अ. समुद्रसपाटीपासून ३ सहस्र २०० फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले श्री व्यंकटेश्वर मंदिर येथील सर्वांत मोठे आकर्षण आहे.
आ. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तूकला आणि कलाकुसर यांचे एक अद्भुत उदाहरण आहे. संगम साहित्यात तिरुपतींना ‘त्रिवेगादम्’ म्हणून संबोधले जाते.
इ. तिरुपतीच्या इतिहासाविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. ‘बालाजीची मूर्ती दगडी आहे. मंदिराचा गाभारा अतिशय थंड आहे; परंतु तरीही या मूर्तीला घाम येतो. घामाचे थेंब स्पष्टपणे दिसतात, तसेच मूर्तीची पाठही घामाने थपथपलेली असते’, असे सांगितले जाते.
ई. एकदा बालाजीच्या हनुवटीमधून रक्त येत होते. तेव्हापासून बालाजीच्या मूर्तीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा चालू झाली आहे.
उ. मंदिरापासून २ किलोमीटर अंतरावरील एका गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश निषिद्ध आहे. तेथील लोक त्यांच्या ठरलेल्या नियमांप्रमाणे त्यांचे जीवन व्यतित करतात. तेथून आणलेली फुले देवाला अर्पिली जातात, तसेच तेथून आणलेले दूध, तूप आणि लोणी इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात.
ऊ. मंदिरामधील देवाची मूर्ती सुंदर कपडे आणि सोन्याचे दागिने यांनी सजवली जाते. मंदिरात या दागिन्यांचे विशाल भांडार आहे.
३. तिरुपती बालाजीच्या माध्यमातून पृथ्वीवर श्रीविष्णूंचा निवास असणे
‘कलियुगामध्ये भक्तांना मोक्षाला नेण्यासाठी भगवान श्रीविष्णु या मंदिरात स्वतः प्रकटले’, अशी मान्यता आहे. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिराला ‘भूतलावरील वैकुंठ’, असे म्हटले जाते. त्या माध्यमातून पृथ्वीवर श्रीविष्णूचा निवास आहे.
४. गर्भगृहाचे वैशिष्ट्य
भगवान बालाजी हे मंदिरातील गर्भगृहाच्या मध्यभागी उभे असलेले दिसतात; परंतु बाहेरून पाहिल्यास ते उजव्या बाजूला कोपर्यात उभे आहेत, असे दिसते. गर्भगृहात घेतलेली कोणतीही वस्तू बाहेर आणली जात नाही.
५. सहस्रो वर्षांपासून न विझता जळणारा अखंड दीप !
मूर्तीच्या कानाला कान लावल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो. मंदिरामध्ये ज्योत अखंड तेवत असते. खरेतर या दिव्यात कधीही तेल वा तूप घातले जात नाही. तरीही गर्भगृहात जळणारा हा दीप कधीच विझत नाहीत. हा दीप किती सहस्रो वर्षांपासून जळत आहे, याविषयी कुणालाही माहिती नाही. मंदिरात तेवणारा दीप कुणी प्रज्वलित केला, याविषयीचे गूढ कायम आहे.’
(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संकेतस्थळ)