रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले (वय ४९ वर्षे) यांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न
१. सहसाधिकेने ‘तुमचे अक्षर नीट वाचता येत नाही’, असे सांगितल्यावर पुष्कळ वाईट वाटणे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी ‘मी चांगले अक्षर काढायला शिकवते’, असे सांगणे
‘१५.९.२०२३ या दिवशी मला सहसाधिकेने सांगितले, ‘‘तुमचे अक्षर आम्हाला नीट समजत नाही आणि त्यामुळे ते वाचता येत नाही.’’ तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. ‘अक्षर चांगले काढता येण्यासाठी काय करावे ?’, असा विचार मी करू लागले. मी आश्रमातील आमच्या खोलीत गेल्यावर खोलीतील साधिका श्रीमती मनीषा गाडगीळकाकू (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांना त्याविषयी सांगितले. तेव्हा काकू मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला चांगले अक्षर काढायला शिकवते. तुम्ही प्रयत्न करा. मग तुमचे अक्षर निश्चितच चांगले येईल.’’
२. ‘हस्ताक्षर सुधारावे, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प आहे’, असे जाणवून ‘स्वतःचे अक्षर निश्चितच सुधारेल’, असे वाटणे
श्रीमती गाडगीळकाकूंनी सनातनचा ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ (देवनागरी अक्षरे म्हणजे संस्कृत, मराठी अन् हिंदी अक्षरे) हा ग्रंथ माझ्यासाठी आणला. या ग्रंथातील प्रार्थनेत ‘मोठ्यांनीही आपल्या अक्षराला वळण लावायला हरकत नाही’, असे लिहिले आहे. हे वाचल्यावर ‘हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्पच आहे’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा ‘माझे अक्षर निश्चितच सुधारेल’, असे मला वाटले. ‘शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते’, हे मला त्यातून शिकायला मिळाले.
३. हस्ताक्षर सुधारावे यासाठी केलेले प्रयत्न
३ अ. श्रीमती गाडगीळकाकूंनी वहीत काही अक्षरे काढून देणे आणि साधिकेने ती अक्षरे गिरवणे : त्यानंतर श्रीमती गाडगीळकाकूंनी मला प्रथम प्रार्थना करायला सांगितले. प्रार्थना केल्यावर ‘प.पू. डॉक्टरच माझ्याकडून चांगले अक्षर येण्यासाठी प्रयत्न करून घेतील’, असा मला आत्मविश्वास वाटू लागला. त्या दिवशी काकूंनी मला वहीत काही अक्षरे काढून दिली आणि मी ती गिरवली. अक्षरे गिरवतांना मला पुष्कळ आनंद मिळाला.
३ आ. प्रतिदिन रात्री ३० मिनिटे लिखाण करणे : दुसर्या दिवशी मी सहसाधिका सौ. मनीषा गायकवाड यांना हे सांगितल्यावर त्यांनीही मला साहाय्य म्हणून दुरेघी ओळींची वही आणून दिली. नंतर मी प्रतिदिन श्रीमती मनीषा गाडगीळकाकू सांगतील, तसे प्रयत्न करू लागले. मी प्रतिदिन रात्री ३० मिनिटे लिखाण करू लागले.
३ इ. लहान लहान शब्द लिहायला सांगणे : त्यानंतर श्रीमती गाडगीळकाकू मला लहान लहान शब्द लिहिण्यास सांगायच्या. ते शब्द मला नियमित सेवा करतांना नेहमी लागणारे असायचे. काही दिवसांनी माझे अक्षर थोडे थोडे चांगले येऊ लागले.
३ ई. मनीषा गाडगीळकाकूंनी हात धरून साधिकेकडून लहान मुलाप्रमाणे शब्द गिरवून घेणे : कधी माझे अक्षर चांगले आले नाही, तर काकू माझा हात हातात धरून माझ्याकडून लहान मुलाप्रमाणे ते गिरवून घ्यायच्या. माझे अक्षर किंवा शब्द लिहितांना चुकल्यास त्या मला तो शब्द ५ वेळा लिहायला सांगायच्या. ‘माझे अक्षर सुधारावे’, अशी काकूंना पुष्कळ तळमळ होती.
त्यामुळे मी अक्षर चांगले येण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागले. मी ३ मास प्रयत्न करत होते. तेव्हा मला लिखाणाचा कधीही कंटाळा आला नाही.
४. श्रीमती गाडगीळकाकूंनी प्रोत्साहन दिल्याने आत्मविश्वास वाढणे
काकू माझी वही नियमित पहात आणि चांगले अक्षर आल्यावर माझ्या वहीवर ‘छान !’, असे लिहून मला प्राेत्साहन देत. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. त्यानंतर काही दिवसांनी काकूंनी माझी परीक्षा घेतली. तेव्हा त्यांनी मला २० शब्द लिहिण्यास सांगितले. त्यातील माझे १७ शब्द योग्य आले. त्यानंतर ‘माझे अक्षर आणखी चांगले यायला हवे’, अशी माझी तळमळ वाढली.
५. हस्ताक्षर सुधारल्यावर गुरुचरणी कृतज्ञता वाटणे
मी फलकावर चूक लिहितांना चांगल्या अक्षरांत लिहिण्याचा प्रयत्न करू लागले. सेवा करतांना वहीत लिहित असतांनाही वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही सहसाधकांनी ‘माझे अक्षर आता चांगले येते’, असे मला सांगितले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझे अक्षर चांगले येऊ लागले आहे’, असे वाटून त्यांच्याविषयी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
अजूनही मला पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत. आता मी व्याकरण सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे.
६. अक्षरे काढतांना झालेले त्रास आणि आलेली अनुभूती
‘ॐ’ हे अक्षर काढतांना मला आध्यात्मिक लाभ व्हायचे. थोड्या वेळाने मला ‘लिखाण करू नये’, असे वाटायचे. तेव्हा काकू माझ्याकडून प्रार्थना करून लिखाण पूर्ण करून घ्यायच्या. ते पान पूर्ण लिहून झाल्यावर मला उत्साह वाटायचा.
परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि श्रीमती मनीषा गाडगीळकाकू यांची तळमळ यांमुळे माझे अक्षर सुधारले. त्याबद्धल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती संध्या तबाजी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |