ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानदेव अजरामर झाले।
आज २३ सप्टेंबर २०२४ या दिवशी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना स्फुरलेले काव्य येथे दिले आहे.
ज्ञानेश्वरी ग्रंथाची कशी करावी स्तुती।
सर्वत्र गाजते ज्ञानेश्वरांची कीर्ती।। १।।
कृपेचा वर्षाव केला श्रीविठ्ठल भगवंताने।
प्रेरित झाले ज्ञानदेव आत्मज्ञानाच्या प्रेरणेने।। २।।
मोगर्याच्या फुलाप्रमाणे आत्मज्ञान प्रगटले अंतरी।
ज्ञानदेवांच्या आत्मज्ञानाचा वेल गेला गगनावरी।। ३।।
संस्कृतमधील गीता मराठीत करण्या ओवीबद्ध।
संत ज्ञानेश्वर महाराज झाले सर्वार्थाने सिद्ध।। ४।।
शिष्य ज्ञानदेवांवर कृपा केली गुरु निवृत्तीनाथांनी।
‘भावार्थदीपिके’ची (टीप १) रचना केली ज्ञानेश्वरांनी।। ५।।
त्यांना सोप्या अन् रसाळ भाषेत स्फुरले दिव्य ज्ञान।
ज्ञानदेवांनी केले ज्ञानेश्वरीचे लीलया लिखाण।। ६।।
ज्ञानेश्वरीची रचना करून ज्ञानदेवांनी कृपा केली।
त्यामुळे संस्कृतमधील गीता मराठीत अवतरली।। ७।।
संत ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानाचा आविष्कार केला।
संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीतेचा मराठीत अनुवाद लिहिला।। ८।।
संत ज्ञानेश्वरांनी लोककल्याणासाठी ज्ञानेश्वरी लिहिली।
अन् त्यानंतर त्यांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली।। ९।।
१८ अध्यायांनी ज्ञानेश्वरी परिपूर्ण झाली।
ज्ञानदेवांनी पसायदानाने तिची सांगता केली।। १०।।
ज्ञानेश्वरीचा प्रसार केला संत नामदेवादी संतांनी।
भागवत धर्माचा पाया रचला संत ज्ञानेश्वरांनी।। ११।।
ज्याप्रमाणे काळोख नष्ट होतो इवल्याशा ज्योतीने।
त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले ज्ञानेश्वरीच्या ज्ञानतेजाने।। १२।।
जिज्ञासू तृप्त झाले ज्ञानेश्वरीच्या अमृतपानाने।
मराठी साहित्य समृद्ध झाले ज्ञानेश्वरीतील ज्ञानाने।। १३।।
कीर्तनकार कृतार्थ झाले ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने।
भाविकही प्रभावित झाले ज्ञानेश्वरीच्या संकीर्तनाने।। १४।।
ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात वाहे ज्ञानदेवांची ज्ञानगंगा।
ज्ञानगंगेत अखंड डुंबल्याने सुगंध दरवळे सर्वांगा।। १५।।
ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात विठुरायाचे दर्शन घडले।
ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानदेव अजरामर झाले।। १६।।
ज्ञानदेवांच्या चरणी अर्पिते ही काव्यसुमनांजली।
ज्ञानदेवांनी स्वीकारावी ही भावसुमनांजली।। १७।।
टीप १ – ‘भावार्थदीपिका’ हे ‘ज्ञानेश्वरीचे’ दुसरे नाव आहे.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |