Karnataka HC Sugested Spiritual Advice On Divorce : घटस्फोटासाठी आलेल्या दांपत्याला उच्च न्यायालयाने सल्ला घेण्यासाठी संतांकडे पाठवले !
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठातील घटना
कोप्पळ (कर्नाटक) – घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेल्या दांपत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाचे न्यायमूर्ती श्रीकृष्ण दीक्षित यांनी गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला.
१. गदग जिल्ह्यातील एका दांपत्याने ४ वर्षांपूर्वी धारवाड उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. १७ सप्टेंबर या दिवशी यावर सुनावणी करतांना न्यायमूर्ती श्रीकृष्ण दीक्षित यांनी सांगितले की, पती-पत्नींमध्ये समस्या असणे नैसर्गिक आहे. त्याआधारे वेगळे होणे योग्य नाही. जर मानसिक समस्या असतील, तर मानसोपचारतज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
२. त्यावर दांपत्याने ‘आधीच मानसोपचारतज्ञांकडे गेलो आहोत’, असे सांगितले. तेव्हा न्यायमूर्तींनी म्हणाले की, मग मठाधिशांकडे जा.
३. पतीने गदगच्या तोण्टदार्य मठाच्या स्वामीजींकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु पत्नीने याला सहमती दिली नाही. न्यायमूर्तींनी पत्नीला विचारले, ‘मग कोणत्या स्वामीजींकडे जाल ? हे तुम्हीच सांगा.’ त्यावर पत्नीने ‘आम्ही कोप्पळच्या गविसिद्धेश्वर स्वामीजींकडे जाऊ’ असे सांगितले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, ‘छान आहे, गविसिद्धेश्वर स्वामीजी विवेकानंदांसारखे आहेत. मी त्यांचे प्रवचन ऐकले आहे. तुम्ही त्यांच्याकडेच जा.’
४. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार पती-पत्नी दोघे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कोप्पळच्या गविसिद्धेश्वर मठात जाणार आहेत. गविमठाच्या परंपरेत हे पहिले असे विशेष प्रकरण आहे.